"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:04 IST2025-12-19T11:03:00+5:302025-12-19T11:04:35+5:30
BMC Election Mumbai Politics: मुंबई महापालिकेमध्ये भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचा थेट सामना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यासोबत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपने आता उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरवात केलीये.

"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
BMC Election 2026: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीमुळे मुंबईतील राजकारणाचा पारा चढू लागला आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई फारशी ताकद नसल्याने मुंबईतील महायुतीतील भाजप-शिवसेना विरुद्ध शिवसेना-मनसे अशीच लढाई होणार, असेच चित्र आहे. भाजपकडूनही तसेच संकेत मिळत आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंनाच घेरण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एका काव्यातून ठाकरेंवर पुन्हा हिंदुत्व आणि रामाच्या मुद्द्यावरून तोफ डागली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राज ठाकरे यांच्या मनसेसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे ठाकरे काँग्रेससोबत जाण्याचा मुद्दा निकाली निघाला आहे. पण, शरद पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच शेलारांनी ठाकरेंना डिवचले आहे.
शेलारांची कवितेतून ठाकरेंवर टीका
भाजप नेते शेलारांनी एका कवितेतून ठाकरेंवर प्रहार केला आहे. काँग्रेसने दूर केल्यामुळे ठाकरे आता शरद पवारांच्या दारात उभे आहेत. तर मनसेची मदत होईल अशी आशा त्यांना आहे, अशा आशयाची ही कविता आहे.
"स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत
घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत
'करुन दाखवलं'चे गाताय जर गाणे,
पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने?"
"अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा
तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र
मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा"
"मारली लाथ काँग्रेसने जोराची
आता उभे राष्ट्रवादी(शप) च्या दारात पसरुन पदर
म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर
यांनी काय केले.. सजवली याकूब मेमनची कबर"
"ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम
काय करणार हे मुंबईकरांसाठी काम?"
महाविकास आघाडीसाठी ठाकरे शिवसेना आग्रही
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी यासाठी ठाकरेंची शिवसेना प्रयत्न करत आहे. एकीकडे मनसेसोबत जागावाटपाबद्दल चर्चा सुरू असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोबत असावे यासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आघाडीत सामील व्हावे, यासाठी प्रस्ताव दिला गेला. त्यात काँग्रेसनेही सोबत यावे यावरही चर्चा झाली. शरद पवार यासाठी आता काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत.