महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:18 IST2025-07-31T19:16:31+5:302025-07-31T19:18:37+5:30

Mahadev Munde Case SIT News: बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपासासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. मयत मुंडे यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी यासंदर्भातील आदेश दिले. 

SIT to investigate Mahadev Munde murder case; CM Fadnavis orders after meeting family | महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

Mahadev Munde Case CM Devendra Fadnavis: परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी आमदार सुरेश धसही उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याचा निर्णय घेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांकडून उपोषण, आंदोलन केले गेले. गुरुवारी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची तिन्ही मुले, वडील दत्तात्रय मुंडे, आई चंद्रकला मुंडे, ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

भेटीनंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे

हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, त्याचबरोबर पोलीस अधिकारी पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा तपास पथकामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. 

कुटुंबीयांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली असून, त्यात पीएसआय संतोष साबळे यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

कोणालाही पाठिशी घालणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबीयांना धीर दिला. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यानंतर फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना कॉल केला. 

"तुम्हाला जे अधिकारी हवेत ते सर्व दिले जातील. सर्व आरोपींना तात्काळ अटक करा", असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. 

मुख्यमंत्री फडणवीसही भावूक झाले -ज्ञानेश्वरी मुंडे

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, "महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या २१ महिन्यात जे घडले त्या सगळ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. ते सर्व ऐकून मुख्यमंत्री भावूक झाले. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही, असा शब्द दिला. एसआयटी नेमण्याचे आदेश दिले. बीडच्या पोलीस अधीक्षकांनाही मुख्यमंत्र्यांनी कॉल केला आणि कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."

Web Title: SIT to investigate Mahadev Munde murder case; CM Fadnavis orders after meeting family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.