कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 10:06 IST2024-12-12T09:49:14+5:302024-12-12T10:06:03+5:30
कुर्ला बस अपघातानंतर मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढल्या जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
Kurla Bus Accident : कुर्ला पश्चिम येथे झालेल्या भीषण बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जखमी आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर ही बस वर्दळीच्या ठिकाणी घुसली आणि वाहनांसह नागरिकांना चिरडत गेली. त्यानंतर एका इमारतीच्या भिंतीला धडकल्यानंतर ही बस थांबली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली आहे. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता. तर स्थानिकांकडून मदत आणि बचावकार्य करण्यात येत होते. मात्र यासगळ्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडल्याचे पाहायला मिळालं आहे. अपघातानंतर मृत महिलेच्या हातातील बांगड्या काढल्या जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
कुर्ला बस अपघातानंतरचा धक्कादायक असा व्हिडीओ आता समोर आला आहे. अपघातामधील मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या जात असल्याचे व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. हेल्मेट घातलेल्या एका तरुणाने अपघातानंतर मदतीऐवजी सर्वांसमोर महिलेचा मोबाईल हातात धरत सोन्याच्या बांगड्या काढण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आता मुंबई पोलीस तपास करणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
महिलेच्या हातातून बांगड्या काढणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. सोन्याच्या बांगड्या काढत असताना तो तरुण महिलेचा मोबाईल माझ्याकडे असल्याचे सांगत होता. त्यावेळी लोकांना त्याला बांगड्या काढू नको असं सांगितले. त्यावर तरुणाने मोबाईलवर मला फोन आला तर माझ्याकडे बांगड्या आहेत असं सांगेल असे म्हणताना ऐकू येत आहे.
"पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याची चौकशी केली जाणार आहे. मृत महिलेच्या हातातील बांगड्या काढणारी व्यक्ती कोण आहे आणि त्याने बांगड्या का काढल्या आणि तो कुठे गेला याचा तपास पोलीस करणार आहेत. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार आहे," अशी माहिती झोन ५चे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.
संजय मोरेला फक्त एकाच दिवसाचे प्रशिक्षण
दरम्यान, कुर्ला बस अपघातातील मुख्य आरोपी चालक संजय मोरे यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस हाताळणीचे त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील दोन दिवस संगणकावर इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीबाबत समजावून सांगण्यात आले व तिसऱ्या दिवशी हाती बस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला एकच दिवसाचे प्रशिक्षण मिळाल्याची माहिती आरोपी संजय मोरे यांनी दिली. बस अनियंत्रित कशी झाली, हे माहीत नाही. आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत कोणाकडूनही तक्रार आली नाही, असा दावा मोरेने केला होता.