मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:43 IST2025-11-26T09:41:10+5:302025-11-26T09:43:37+5:30
Mumbai Crime Video: २१ वर्षीय मित्राला पाच जणांनी केक कापण्यासाठी घराच्या खाली बोलवून घेतलं. तो आल्यानंतर जे केलं, त्याने सगळेच हादरले. ही घटना इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
Mumbai Crime Latest News: वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने पाच मित्रांनी एकाला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. या घटनेत २१ वर्षीय तरुण होरपळला आहे. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली आहे. ही सगळी घटना इमारतीत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात ही घटना घडली आहे. अब्दुल रहमान असे होरपळून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातून बाहेर बोलावले
कुर्ला पश्चिममधील कोहिनूर सिटी इमारतीच्या खाली ही घटना घडली. २५ नोव्हेंबर रोजी अब्दुल रहमान याचा २१ वा वाढदिवस होता. रात्री १२ वाजता त्याचे पाच मित्र इमारतीच्या खाली आले आणि त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी अब्दुलला खाली बोलावेल. ते सोबत केक घेऊन आले होते.
अंडी फेकली, दगड फेकले आणि पेट्रोल टाकून पेटवले
अब्दुलचा भावाने सांगितले की, अब्दुल खाली गेल्यानंतर त्याचे पाच मित्र अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शरीफ शेख यांनी आधी त्याला केक कापायला लावला. त्यानंतर त्यांनी अब्दुलवर अंडी फेकली. दगड फेकले.
इतक्यावरच ते थांबले नाही. त्यांनी स्कुटीमधून एका बॉटलमध्ये पेट्रोल आणलेले होते. ते त्यांनी अब्दुलवर टाकले आणि त्याला आग लावली. पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला. त्यानंतर अब्दुलने अंगावरील कपडे काढून फेकत स्वतःचा जीव वाचण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो भाजला.
मुंबईत वाढदिवसाचं सेलेब्रेशन करताना ५ मित्रांनीच
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) November 26, 2025
२१ वर्षीय मित्राला पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना#Mumbai#birthdaypic.twitter.com/5vd3IHuCxM
गंभीर जखमी झालेल्या अब्दुलला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अब्दुलला पेटवून देतानाचा प्रकार इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पाच मित्रांना पोलिसांनी केली अटक
अब्दुल रहमानच्या तक्रारीवरून विनोबा भावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान, शरीफ शेख या पाच जणांनाही अटक केली आहे.