Join us  

भाजपा-मनसे संभाव्य युतीवर शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया; काँग्रेस-राष्ट्रवादीची सावध भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:29 PM

मनसेकडून मुंबईत होणाऱ्या २३ जानेवारीच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबई - राज्यातील बदलत्या समीकरणानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं सरकार राज्यात स्थापन झालं. शिवसेनेचा मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री विराजमान झाले. पण महाविकास आघाडीमुळे सत्तेपासून लांब राहिलेल्या भाजपाने भविष्यातील समीकरणं जुळविण्याचे प्रयत्न सुरु केलेत. 

शिवसेनेच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या हिंदुत्ववादी मतदारांना जवळ खेचण्यासाठी भाजपाकडूनमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बळ देण्याची हालचाल सुरु झाली आहे. आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठकही झाली आहे. भविष्यात काहीही घडू शकते असा दावा भाजपा आणि मनसेचे नेते करत आहेत. त्यामुळे मनसे-भाजपा युती आगामी काळात संभाव्य आहे अशी चर्चा राजकारणात आहे. 

मनसे, भाजपाची युती होणार?; राजू पाटील यांनी केलं मोठं विधान

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत होणाऱ्या २३ जानेवारीच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं गरजेचे आहे. मराठी कार्डाचा वापर करुन अपेक्षित यश निकालात मिळत नसल्याने राज ठाकरे सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने जातील असं सांगण्यात येत आहे. मनसेच्या धोरणांमध्ये तसेच झेंड्यामध्ये बदल करण्यात येईल असं सांगितले जात आहे. मात्र मनसे-भाजपा संभाव्य युतीवर महाविकास आघाडीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

राज-फडणवीस भेटीवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे नवे राजकीय संकेत; म्हणाले की...

याबाबत बोलताना शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी भविष्यात अशाप्रकारे कोणतीही युती झाली तरी त्याचा परिणाम होणार नाही असं मत मांडले आहे तर राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची फक्त भेट झाली आहे. सध्यातरी मनसे-भाजपा युती होईल असं वाटत नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे तर मनसे-भाजपा युतीबाबत अद्याप शक्यता दिसत नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मनसेने अद्याप कोणाच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली नाही. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर मनसेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षासाठी मत मागण्याचं आवाहन मनसेने केले होतं पण राज्यातील राजकीय समीकरण बदलल्याने मनसे महाधिवेशनात काय धोरण ठरविणार हे पाहणं गरजेचे आहे.  

टॅग्स :राज ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमनसेभाजपाअशोक चव्हाणदेवेंद्र फडणवीसछगन भुजबळ