Join us

Maharashtra Government : ...तर भाजपानेच शिवसेनेला पाठिंबा दिला असता: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 15:50 IST

Maharashtra News : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा असल्याचे बोलून दाखवत आहे.

मुंबई: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून अडीच- अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली होती. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा असल्याचे बोलून दाखवत आहे. यावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं आहे याची माहिती आधीच दिली असती तर भाजपाने देखील त्यांना पाठिंबा दिला असता असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले म्हणाले की, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी मी अनेक प्रयत्न केले. परंतु भाजपाने शिवसेनेची अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबतची मागणी अमान्य केल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरु केली. त्यातच आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांनी देखील वारंवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी राज्याची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे अधीच माहिती असते तर भाजपाने देखील पाठिंबा दिला असता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास त्यांनी जनतेची काम करवी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच टिकून राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना शुक्रवारी पॅन, आधार कार्ड, आदी पुराव्यासह मुंबईत बोलावले आहे. त्यांना तीन-चार दिवस राहण्याच्या तयारीने येण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते. 

टॅग्स :रामदास आठवलेउद्धव ठाकरेभाजपाशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र सरकार