“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:53 IST2025-09-29T16:53:09+5:302025-09-29T16:53:16+5:30
Shiv Sena UBT Mahesh Sawant: जाहिरातीचे अजूनही जर काही पैसे राहिले असतील तर ते पूरग्रस्तांना द्या, असा पलटवार ठाकरे गटाने भाजपावर केला आहे.

“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
Shiv Sena UBT Mahesh Sawant: मराठवाडा, सोलापूरसह अनेक ठिकाणी पाऊस आणि पूरस्थिती कायम आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशा मागण्या विरोधकांकडून केल्या जात आहेत. यातच पीएम केअर फंडातून ५० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून भाजपावर टीका केली जात आहे. याला भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांचे सगळे उद्ध्वस्त झाले आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल, अशी पोस्ट केशव उपाध्ये यांनी एक्सवर केली. याला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आले.
देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता
मुंबईमध्ये जे देवाभाऊ असे लिहीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या, त्याचा खर्च तुम्ही पूरग्रस्तांना द्यायला हवा होता. अजूनही जर काही पैसे राहिले असतील तर ते पूरग्रस्तांना जाहिरातीचे द्या. दसरा मेळावा करणे ही आमची परंपरा आहे आणि आमची मदत पूरग्रस्तांना सुरू आहे. मलाही अनेक फोन येत आहेत. त्यानुसार आम्ही जी हवी ती मदत कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे देत आहोत, असे उत्तर ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी दिले.
दरम्यान, वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो. आमचा मेळावा होणारच. त्याची तयारी सुरू झाली आहे. विभाग प्रमुखांची बैठक झाली आम्हाला जबाबदारी दिली आहे .बाहेरून माणसे येणार आहेत त्यांची व्यवस्था करावी लागणार आहे .सगळी व्यवस्था करत आहोत, अशी माहिती महेश सावंत यांनी दिली.