Shiv Sena Sanjay Raut : "... तर कुणाच्या बापाला घाबरू नका, बाळासाहेबांच्या याच मंत्रानं उद्धव ठाकरे शिवसेना पुढे नेताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:25 IST2022-02-15T16:24:56+5:302022-02-15T16:25:38+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील पाहत आहेत. त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत : संजय राऊत

Shiv Sena Sanjay Raut : "... तर कुणाच्या बापाला घाबरू नका, बाळासाहेबांच्या याच मंत्रानं उद्धव ठाकरे शिवसेना पुढे नेताहेत"
"आजची पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) देखील पाहत आहेत. त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत," असं संजय राऊत पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले. पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मन साफ असेल तर कुणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे," असंही ते म्हणाले.
"मन साफ असेल तर कुणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही असं बाळासाहेब नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एक मंत्र दिला. आयुष्यभराचा तो मंत्र आहे. तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका. आज उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत," असं संजय राऊत यावेळी म्हणाले. मागून कितीही वार केलेत तरीही शिवसेना घाबरणार नाही. महाराष्ट्राचं सरकार 'त्यांना' पाडायचं आहे आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सरकार पाडण्यासाठी तारखा
"महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केलाय जातोय, बहुमत असतानाही सरकार पाडण्याची तारीख दिली जातेय. केंद्रीय तपास यंत्रणांचं संकट महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवरदेखील आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल," असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.
आम्हाला ही पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घ्यायची होती. परंतु सुरूवात शिवसेना भवनातून करू आणि अंत ईडीच्या कार्यालयासमोर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ईडीकडून भल्या पहाटे महाराष्ट्रातील माझ्या, काँग्रेस आणि पवारांच्या घरांवर रेड टाकली जाते. हे केवळ महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून चालेले षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.