Join us

...तर मी संजय राऊतांना बहाद्दर समजेन; गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला, सगळा हिशेब मांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:20 IST

१९९२च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. 

गुवाहाटी/ मुंबई- मंत्री आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीत बंडखोर आमदारांशी संवाद साधत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आपल्या सर्वांवर जिल्ह्यात विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहे. तसेच आपल्या पाठीशी देखील अनेक लोक उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. आपण सर्व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहोत. आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आपण सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादमुळे या पदापर्यंत पोहचलो. पण आमची स्टोरी जर संजय राऊतांना सांगितली, तर १९९२च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. 

संजय राऊतांनी ४७ डिग्री सेल्सियस तापमानात जळगावमध्ये येऊन ३५ लग्न लावावे, मी बहाद्दर समजून घेईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच ज्यावेळी रात्री १२ वाजता रक्ताची गरज भासते, तेव्हा आमचा मोबाईल कधीच बंद नसतो. कार्यकर्त्यांच्या वेळीप्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत असतो. आपण शिवसेनेचे ३९ आमदार आणि ११-१२ अपक्ष आमदार असे मिळून त्यांना आपण पुरे आहोत. त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीय का?, आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व काही मिळालं, पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहे, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. तसेच गुलाबराव पाटलांना आम्ही पानटपरीवर बसवू, असं संजय राऊत म्हणाले. मात्र त्यांना पानटपरीवर चुना कधी लावून जाईल हे त्यांना कळणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी राज्यपालांनी आज मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणं मागितलं आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात. आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल, त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत, असे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

शिंदे गटाची स्ट्रॅटेजी-

राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे गटाने स्ट्रॅटेजी तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, असा स्टँड बंडखोर गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे समजते.

टॅग्स :संजय राऊतगुलाबराव पाटीलशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ