Shiv Sena office bearers overwhelmed by Uddhav Thackeray's hospitality | उद्धव ठाकरे यांच्या पाहुणचाराने भारावले शिवसेनेचे पदाधिकारी

उद्धव ठाकरे यांच्या पाहुणचाराने भारावले शिवसेनेचे पदाधिकारी


मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला बघण्याचा योग थोड्यांनाच मिळतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला बघण्याचा योग काल सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रथमच आला. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. गरम गरम चहा, चविष्ट उपमा आणि लाडू असा नाष्टाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांच्या पाहुणचाराने  शिवसैनिक जणू भारावून गेले. तर ट्रॅफिक मध्ये अडकयला नको म्हणून शिवसेनेच्या पदाधिकारी लवकर निघून वेळेत वर्षा बंगल्यावर पोहचले.अनेक पदाधिकाऱ्यांनी वर्षा बंगल्याच्या आठवणी टिपण्यासाठी त्यांच्या मोबाईच्या कॅमेऱ्यातून फोटो देखिल टिपले आणि सोशल मीडियावर शेअर देखिल केले.

निमित्त होते ते आगामी पालिका निवडणुकीत मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याच्या प्राथमिक तयारीसाठी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वर्षा वर बोलावण्यात आले होते.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम अंधेरी (पश्चिम),अंधेरी (पूर्व) वर्सोवा या तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी प्रथम संवाद साधला.त्यानंतर जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी व गोरेगाव या तीन विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.तर आज सायंकाळी
विभाग क्रमांक 1 मधील दहिसर,बोरिवली व मागाठाणे येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.गेल्या शनिवार पासून स्वतःमुख्यमंत्री हे मुंबई शहर व उपनगरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.

सुमारे 6 ते 7 मिनीटे संवाद साधतांना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या शिवसैनिकांमुळे मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे तुम्हाला आज वर्षा बंगल्यावर बोलावले आहे. कोविड मुळे आज थोड्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलावले.मात्र कोविड गेल्यावर सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलावण्यात येईल. मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी मिशन 2022 लक्षात ठेवा.विरोधकांनी टिका केली तर लक्ष देऊ नका.आपले काम करत जा. महापालिकेचे  राज्य सरकारच्या स्तरावरील असलेले प्रश्न आपले विभागप्रमुख व आमदारांच्या मार्फत मांडा. ते निश्चित सोडवले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई,परिवहन मंत्री व विभागप्रमुख अँड.अनिल परब,खासदार विनायक राऊत,खासदार अनिल देसाई,शिवसेनेचे प्रवक्ते,विभागप्रमुख व आमदार सुनील प्रभू,माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही शिकवण शिवसैनिकांना दिली. आज शिवसेनेच्या 227 शाखा या कान व डोळे आहेत.12 पुरुष व महिला विभागप्रमुख,विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक,उपविभागप्रमुख,227 शाखाप्रमुख व सुमारे 10000 गटप्रमुख असा मोठा शिवसैनिकांचा ताफा शिवसेनेकडे आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची युवासेना सुद्धा जोमाने काम करत अनेक लोकपयोगी उपक्रम राबवत आहे.

शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांच्या लोकाधिकार समितीचे कार्य देखिल जोमाने सुरू आहे.भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली मोठा कामगार वर्ग आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याचे चित्र आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena office bearers overwhelmed by Uddhav Thackeray's hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.