Maharashtra Government: शिवसेनेचे आमदार बैठकीनंतर जयपूरला होणार रवाना; गोव्याला जाण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 18:26 IST2019-11-21T18:21:54+5:302019-11-21T18:26:50+5:30
दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठक होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उद्या (22 नोव्हेंबर) मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे.

Maharashtra Government: शिवसेनेचे आमदार बैठकीनंतर जयपूरला होणार रवाना; गोव्याला जाण्याची इच्छा
मुंबई: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठक होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उद्या (22 नोव्हेंबर) मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना जयपूरला रवाना करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी!
अब्दुस सत्तार म्हणाले की, आम्हाला पाच दिवसांसाठी तयारी करुन यावं असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मी पॅन कार्ड, आधार कार्डसह मी मुंबईत दाखल झालो आहे. तसेच आम्ही गेल्या वेळेस मुंबईच्या हॅाटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवण्यात आले होते. मात्र एकाच ठिकाणी जास्त दिवस राहिल्यानंतर तिथं मन लागत नाही त्यामुळे सर्व आमदारांची यावेळी गोव्याला जाण्याची इच्छा असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
'...तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाच काय, १५ वर्षं टिकेल!'
राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्यांवर एकमत झाले असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना शुक्रवारी पॅन, आधार कार्ड, आदी पुराव्यासह मुंबईत बोलावले आहे. त्यांना तीन-चार दिवस राहण्याच्या तयारीने येण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते.