Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संपली, राष्ट्रवादीही शिल्लक राहणार नाही; भाजप खासदाराचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 11:04 IST

शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरेंना सोडून गेला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध पाहायला मिळतं. त्यामध्ये, अजित पवारांवर प्रेम करणारा, त्याचा चाहता कार्यकर्ता वर्ग कायम अगेसर असतो. त्याच दादा प्रेमातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता अजित पवार यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केला होता. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांचाही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड झळकला. त्यामुळे, राष्ट्रवादीतील ही मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा समोर आलीय. यावरुन, आता भाजपने राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होणार असल्याचं म्हटलंय. 

शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरेंना सोडून गेला. त्यामुळे, शिवसेना पक्षाची चांगलीच वाताहात झाली. त्यातच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ही शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरेंना आता अस्तित्त्वाची लढाई लढावी लागत आहे. त्यावरुनच, आता राष्ट्रवादीचीही भविष्यात अशीच अवस्था होणार असल्याचं भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर निंबाळकर उत्तर देत होते. 

राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे, ते कोणीही पाहू शकतात. पण, ज्याप्रमाणे शिवसेना संपली, शिवसेनेचा विषय संपला. चिन्हही राहिलं नाही,  तसंच पुढचं भविष्य हे राष्ट्रवादीचं आहे, असे भाकीतच भाजपा खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलंय. तसेच, हे माझे सूचक विधान आहे, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी पक्षच शिल्लक राहणार नाही अन् मग मुख्यमंत्रीपदाचं काय घेऊन बसलाय. पक्ष शिल्लक ठेवणं हीच त्यांची अस्तित्त्वाची लढाई आहे, असेही खासदार निंबाळकर यांनी म्हटले.

राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांचे बॅनर झळकले

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बोर्डवर त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यानंतर, राष्ट्रवादीचे दबंग नेते अजित पवार यांचेही बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या बॅनवरवर दिसून आला. विशेष म्हणजे थेट प्रदेश कार्यालयाबाहेरच हा बॅनर झळकल्याने याची चांगलीच चर्चा सुरूय. तर, सुप्रिया सुळेंचाही त्याच आशयाचा बॅनर मुंबईत झळकला होता.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनारणजितसिंह नाईक-निंबाळकरअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस