Shiv Sena gave valuable advice to 'Parth' Pawar saying 'Karlyachi Bhaji', sanjay raut | 'कारल्याची भाजी' म्हणत शिवसेनेनं 'पार्थ' पवारांना दिला मोलाचा सल्ला

'कारल्याची भाजी' म्हणत शिवसेनेनं 'पार्थ' पवारांना दिला मोलाचा सल्ला

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच नाराज आहेत.सामनाच्या कारल्याची भाजी मथळ्याखालील अग्रलेखातून संपादक महोदयांनी पार्थ पवार यांना मोलाचा सल्ला दिलायं.  'आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद' यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असं शिवसेनेनं सूचवलं आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या पवार कुटुंबीयांत सध्या ‘पार्थ’मुळे महाभारत सुरू आहे. पार्थ पवारने ‘जय श्रीराम’चा नारा दिल्यामुळे नाराज असलेले आजोबा शरद पवार यांनी जाहीरपणे त्यांची कानउघाडणी केल्यानंतर वडील अजित पवार यांनी ‘पार्थ लहान आहे, समजून घ्या’, असे म्हणत पुत्राची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. तर, दुसरीकडे शिवसेननं सामनाच्या अग्रलेखातून पार्थ यांना मोलोचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, शिवसेनेनं शरद पवारांची री ओढत पार्थलाच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच नाराज आहेत. विशेषत: पार्थने राम मंदिरासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे ते अधिकच संतापले आहेत. ‘पार्थ अपरिपक्वआहे. त्याच्या बोलण्याला मी काडीचीही किंमत देत नाही’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी मीडियासमोर व्यक्त केली. त्यानंतर, राजकीय वर्तुळात या विषयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांकडून या कुटुंब राजी-नाराजीचं राजकीय भांडवलं केलं जातंय. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी अन् मित्रपक्षाचे नेते घडी बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. सामनाच्या कारल्याची भाजी मथळ्याखालील अग्रलेखातून संपादक महोदयांनी पार्थ पवार यांना मोलाचा सल्ला दिलायं.  'आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद' यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असं शिवसेनेनं सूचवलं आहे. 

दरम्यान, पार्थच्या ‘वेगळ्या’ भूमिकेवरून बुधवारी रात्री ‘सिल्व्हर ओक’वर बरेच रामायण घडल्याचे वृत्त आहे. शरद पवार यांनी खास निरोप देऊन अजित पवारांना घरी बोलावून घेतले. पार्थने राम मंदिरासंदर्भात केलेली विधाने पक्षाच्या भूमिकेशी विसंगत आहेत. विशेषत: एका विशिष्ट समुदायाबद्दल केलेले विधान तर अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे प्रकार वेळीच थांबवले पाहिजेत, नाही तर ज्या भूमिकेवर आपण पक्ष उभा केला, त्या भूमिकेला तडा जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर पार्थ अजून लहान आहे. तो हळूहळू तयार होईल, अशी सारवासारव अजित पवारांनी केली. मात्र, त्याला असे जाहीरपणे बोल लावणे योग्य नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. काका-पुतण्याच्या या संवादावेळी तिथे उपस्थित असलेले जयंत पाटील यांनी पार्थची आपण समजूत काढू, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सुत्रांनी सांगितले.

सामनाचा अग्रलेख
 
चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल. पक्षाची धुरा सांभाळणाऱयांना अनेकदा 'कटू' बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत.

शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून वादळ उठले आहे. म्हटले तर वादळ, म्हटले तर काहीच नाही. हे चहाच्या पेल्यातील वादळही नाही, पण चर्चांचे रवंथ वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे. चोवीस तास 'सबसे तेज' स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांना मिरची मसाला हवा असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त चि. पार्थ यांचे आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे एक पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. शिवाय काही सिनेनिर्मात्यांचीही चौकशी करावी असेही त्यांनी समाज माध्यमांवर सांगितले. आताच त्यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ास शुभेच्छा देणारे पत्र पाठवून रामनामाचा जप केला. यावर निर्माण झालेले वादळ शांत झाल्यावर श्री. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ''माझ्या नातवाच्या बोलण्यास किंमत देऊ नका, तो अपरिपक्व आहे!'' आजोबांनी नातवास मार्गदर्शन करण्याचे त्यांचे राजकीय कर्तव्य पार पाडले व ''उगाच भलत्यासलत्या गोष्टीत लुडबुड करू नका'' असा स्पष्ट संदेश दिला आहे. शरद पवार यांनी सहज मांडलेल्या परखड मतानंतर वृत्तवाहिन्यांत अंदाज व्यक्त करण्याची 'तेज' स्पर्धा सुरू झाली. पवार कुटुंबात सगळे आलबेल नाही, काहीतरी पाणी मुरते आहे असे बातम्यांचे घोडे उधळण्यात आले. अजित पवार यांनाच हा इशारा दिला असेही पत्ते काहींनी पिसले. हे सर्व निरर्थक आहे. सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे हा मूर्खपणा असला तरी महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, जुनेजाणते लोकही सीबीआयची 'री' ओढत आहेत. सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे, असे अग्रलेखातून म्हटले आहे. 

संपूर्ण पवार कुटुंब हे राजकारणातले तालेवार. हा तालेवारपणा अजित पवारांपर्यंत पोहोचला, पण माणसाची जीभ नियंत्रणात नसेल तर मोठा फटका बसतो. असे फटके अजित पवार यांनी राजकीय प्रवासात अनेकदा खाल्ले. त्यामुळे अजित पवार सावध झाले. सध्या अजितदादांचा त्यांच्या जिभेवर संयम आहे. सध्या मी तोलून मापून बोलतो असे अजित पवार जाहीरपणे सांगत असतात; पण चि. पार्थ हे नवखे असल्याने जरा वेगात बोलतात. त्याचे पडसादही उमटतात. अर्थात छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे चि. पार्थ हे 'नवे' आहेत. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यातून वाद निर्माण होतात. शरद पवार यांनी या वादावर पाणीच ओतले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस सक्षम आहेत असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केलेच आहे व आता श्री. शरद पवार यांनीही मुंबई पोलिसांवरच विश्वास व्यक्त केला. राजपूत प्रकरणी सीबीआय वगैरे ठीक आहे हो, पण मुंबई पोलिसांचे काय चुकले ते सांगा. पार्थ पवार यांनी थेट सीबीआयची मागणी करावी हा प्रकार अनेकांना खटकला. त्यामुळे पवार कुटुंबातील धाकल्या पातीस ब्रेक लावण्याचे काम झाले, यात इतके हवालदिल होण्याचे कारण काय? शरद पवारांनी एकप्रकारे पार्थ पवार यांना मार्गदर्शनच केले आहे. पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. ते जिंकू शकले नाहीत. एका जयपराजयाने कुणालाही शिखर गाठता येत नाही वा कायमची घसरणही
होत नाही. शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत. पार्थ पवार यांनी राममंदिराचे स्वागत केले यात चुकीचे काहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मर्जीने राममंदिर होत आहे, अयोध्येत राममंदिर होणे ही लोकभावना आहेच. त्या लोकभावनेच्या प्रवाहात सामील व्हायचा अधिकार प्रत्येकाचा आहे. पार्थ पवार यांचाही आहे. पण ते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाचे वेगळे मत असेल तर मतभिन्नतेचे स्फोट घडतात. स्वतः राहुल, प्रियंका गांधी हे त्या प्रवाहात सामील झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारी केली तेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँगेसने कसलीच खळखळ केली नव्हती. किंबहुना ज्या श्रद्धेने आपण सगळे पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेतो त्याच श्रद्धेने उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत, टीका कसली करता? असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. फक्त चि. पार्थप्रमाणे लांबलचक पत्र लिहून मत मांडले नव्हते. चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल. पक्षाची धुरा सांभाळणाऱयांना अनेकदा 'कटू' बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena gave valuable advice to 'Parth' Pawar saying 'Karlyachi Bhaji', sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.