Join us  

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 5:37 PM

सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत महाशिवआघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते.

मुंबई: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत महाशिवआघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र ही भेट अचानक रद्द करुन राज्यपालांना भेटण्याची वेळ आता पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास गेले असल्याने राज्यपालांसोबतची भेट रद्द केली असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार सध्या ओला दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर गेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे आजची राज्यपालांची नियोजित भेट तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यपालांची नव्याने वेळ घेऊन भेट घेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सत्ता-स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीदेखील सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र महाशिवआघाडीने राज्यपालांसोबतची भेट अचानक रद्द केल्याने विविध चर्चांना उधान आले आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशेतकरीमहाराष्ट्र सरकार