Shiv Sena aggressive on water issues in Madh division | मढ विभागातील पाणी प्रश्नांवर शिवसेना आक्रमक  

मढ विभागातील पाणी प्रश्नांवर शिवसेना आक्रमक  

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: यंदा मुबलक पाऊस झाला असतांना आणि मुंबईकरांना मुबलक पाणी पुरवठा होत असतांना मात्र मालाड पश्चिमेला असलेल्या मढ विभागाला अनियमित व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील भूमीपूत्र व नागरिक हैराण झाले आहेत. येथील भागाला सायंकाळी 6 ते 8 व मध्यरात्री 12.30 ते 1.30 या वेळेत अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने येथील पाण्याची एकच वेळ ठेवावी आणि मुबलक पाणी पुरवठा यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.

येथील आकसा,एरंगळ,भाटी,धारवळी,मास्तर वाडी, कृष्णाचा पाङा, मढ गांव/कोळीवाडा,टोकारा, शिवाजी नगर  इत्यादी भागाला सायंकाळी 6.00 ते 8.00 यावेळेत पाणी पुरवठा होतो. त्यात 6 ते 6.30 या वेळेत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाणी वाया जाते. तर येथील पातवाडी/लोचर गांव, धोंडीगांव, पास्कल वाडी या डोंगराळ भागाला सायंकाळी 6.00 ते 8.00 यावेळेत पाणी पुरवठा पोहचत नाही. या डोंगराळ भागाला मध्यरात्री 12.30 ते 1.30 या वेळेत पाणी येते.

पहाटे लवकर उठून मासेमारीला येथील बोटी जातात, मात्र पाण्यासाठी मध्यरात्री उठावे लागत असल्याने झोपेचे खोबरे होत असल्याने येथील कोळी बांधव व विशेष करून कोळी महिला त्रस्त झाल्या आहेत. अशी मढच्या पाण्याची सद्यस्थिती 49 च्या शिवसेना नगरसेविका संगीता संजय सुतार व  समाजसेवक संजय सुतार यांनी लोकमतशी बोलतांना विषद केली. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे लवकरच येथील पाणी प्रश्न मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मढ विभागातील अपुऱ्या व दूषित पाणी प्रश्नांवर शिवसेना आक्रमक झाली आहे. मढला मुबलक पाणी करावा आणि येथील पाण्याची एकच वेळ येथील सर्व भागांसाठी करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आज नगरसेविका संगीता संजय सुतार व  समाजसेवक संजय  सुतार यांच्या अथक प्रयत्नाने मढ विभागातील अपु-या पाणी पुरवठा समस्यांचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका उपजल अभियंता संजय आर्थे, कार्यकारी अभियंता नथूराम शिंदे,पश्चिम उपनगराचे कार्यकारी अभियंता रमेश पिसाळ,पी उत्तर वार्डचे सहाय्यक अभियंता राकेश शिंदे, दुय्यम अभियंता सचिदानंद कोरे यांनी एरंगळ,धारवळी,मास्तर वाडी, कृष्णाचा पाङा, मढ गांव/कोळीवाडा, पातवाडी/लोचर गांव, धोंडीगांव, पास्कल वाडी, टोकारा, शिवाजी नगर  इत्यादी परिसराची पाहणी केली.

मागच्या आठवड्यात जल अभियंता अजय राठोड यांची भेट घेतली होती. मार्वे ते मढ मंदिर पर्यंत 900 व्यासाची, मढ मंदिर ते जेट्टी 600 व्यासाची नविन जलवाहिन्या टाकणे, प्रत्येक विभागात  6 व 4 इंच च्या नविन जलवाहिन्या टाकणे. तसेच वेगवेगळे झोनल करून  पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा. अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी  केली. त्यावर लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा करू असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी शिवसेनेेला दिल्याचे मच्छिमार नेते किरण कोळी यांनी सांगितले.

आजच्या पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी मालाड विभागसंघटक अनिल भोपी, मच्छिमार नेते किरण कोळी, युवा उपविभाग अधिकारी नितीन कास्कर,शाखाप्रमुख संदेश घरत,म.शा.सं. संगीता कोळी, शिवसैनिक शैलेश केळकर, अशोक सावे, उपेश कोळी, नरेश ठाकूर, मायकेल किल्मो, कृष्णा कोळी, भास्कर कोळी, प्रविण कोळी, अशिष ठाकुर, दिपक वासावे, प्रभाकर कोळी, जगन्नाथ कोळी, देवराम लडगे तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena aggressive on water issues in Madh division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.