Join us

शरद पवार म्हणजे 'ठग्स ऑफ ठेवीदार', घोटाळ्यावरुन शिक्षणमंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:03 IST

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव आल्यानंतर भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावरुन उत्तर देताना, पवार हे व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत, अशी घणाघाती टीका शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच, एक चित्रपट आलेला ठग्स ऑफ हिंदुस्थान, तसं हे ठग्स ऑफ ठेवीदार आहेत, असे म्हणत पवारांचा घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोपच आशिष शेलार यांनी केला आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर भाजपा सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केले. तसेच, सूडबुद्धीचं राजकारण सरकारकडून सुरू असल्याचेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या या आरोपांवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे. या घोटाळ्यात शरद पवारांचं नाव का आलं हे आम्हाला विचारता, पण कोर्टानेच त्यांचं 4 वेळा नाव घेतलं आहे. हा पवार परिवार ठग्स काका पुतण्याचा परिवार असून पवार हे व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, तुम्ही ठग्स परिवार आहात, हेच मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीत लोकांसमोर जाणार आहोत, असेही आशिष शेलार यांनी म्हटलंय. 

अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत बोलताना शेलार यांनी सुप्रिया सुळेंनाही लक्ष्य केलं. काकांना त्रास झाला म्हणून पुतण्यानं राजीनामा दिला. मग, बाबांना त्रास झाला म्हणून मुलीने राजीनामा का नाही दिला ? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.   

टॅग्स :आशीष शेलारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारअंमलबजावणी संचालनालयअजित पवार