अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 15:41 IST2023-07-02T15:39:53+5:302023-07-02T15:41:47+5:30
राज्याच्या राजकारणातील या धक्कातंत्रामुळे नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. तर, शरद पवारांचा आजच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याचे समजते.

अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
मुंबई - अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा पक्षच फोडला आहे. अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणातील या धक्कातंत्रामुळे नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. तर, शरद पवारांचा आजच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याचे समजते.
अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते. त्यामुळे, आता शरद पवार काय भूमिका घेतात, हेही पाहायचं आहे.
शरद पवार लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली आणि राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, शरद पवारांचा या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
दरम्यान, आता शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले असून सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतील, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.