हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 05:46 IST2024-05-18T05:46:05+5:302024-05-18T05:46:57+5:30
महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील मराठी माणसाची शक्ती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नरेंद्र मोदी मला भटकती आत्मा म्हणाले. माणूस गेल्यानंतर आत्मा असतो. हा आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे काही करायचे, त्याची ताकद आम्हाला मिळणार आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला बोलताना उत्तर दिले.
ही आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. यापूर्वी देशाचे नेतृत्व केलेल्यांनी संसदीय लोकशाही पद्धत कशी मजबूत करता येईल, यासाठी अखंड प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच अशी निवडणूक आहे, ज्यात देशासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि तुमचा मूलभूत अधिकार कसा वाचवायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास, आपल्या सर्वांचेच अधिकार उद्ध्वस्त होतील, असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.
बाळासाहेबांची मदत विसरला का?
मोदी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी संकटाच्या काळात तुम्हाला वाचवायचे काम केले, ते तुम्ही विसरला, पण महाराष्ट्राला विसरलेला नाही. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील मराठी माणसाची शक्ती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत पवारांनी मोदींवर टीका केली.