वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:55 AM2020-02-04T03:55:26+5:302020-02-04T06:25:11+5:30

आगामी वर्षात पालिकेवर आर्थिक संकट

Scissors to cover rising costs; Mumbai Municipal Corporation budget today | वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

Next

मुंबई : पालिकेचा अर्थसंकल्प आज आहे. मात्र, उत्पन्नात मोठी घट आणि आस्थापना खर्चात प्रचंड वाढ झाल्याचा मोठा फटका महापालिकेला आगामी आर्थिक वर्षात बसणार आहे. यामुळे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार नाही. याउलट थकबाकी वसूल करणे, वाढीव खर्चांना कात्री, कर्मचारी भरती रद्द आणि जुन्या प्रकल्पांच्या खर्चांमध्ये कपात करणारा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाप्रमाणे आगामी वर्षातही विविध बँकांमधील ठेवीतून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेग देण्याचा प्रयत्न होणार आहे.

सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केला होता. मात्र, गेल्या एक वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यामुळे पालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागला होता. त्यातच पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना कर माफ करण्यात आल्याने, त्याचा मोठा भार महापालिकेवर पडला. या वर्षी मालमत्ता करातून ५८४४.९४ कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज होता. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २३९४.३८ कोटी म्हणजे तब्बल ५० टक्के कमी वसुली झाली आहे. त्याचबरोबर, विकास कराच्या वसुलीतही मोठी घट झाली आहे. यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी मंगळवारी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्पन्नात घट झाल्याचे मान्य करीत, पालिका प्रशासनाने आधीच १,६०० जागांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पालिकेच्या ७९ हजार कोटींच्या मुदत ठेवींशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पांसाठी निधीची चणचण भासणार नाही.

मात्र, मालमता कराच्या उत्पन्नात थेट ५० टक्क्यांनी घट झाल्यामुळे अर्थसंकल्प ३० हजार कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिका काय करणार? आस्थापना खर्च कसा कमी करणार? बेस्ट उपक्रमाचा भार घेणार का? हे मंगळवारी स्थायी समितीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.

यासाठी असेल तरतूद

महालक्ष्मी येथे प्रस्तावित दोन पुलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद असणार आहे. डॉ. इ. मोझेस रोड ते जेकब सर्कल हा पूल आणि महालक्ष्मी रेसकोर्स ते जेकब सर्कल या केबल पुलाचा समावेश आहे. कोर्पोरेट सामाजिक बांधिलकीतून वरळी, महालक्ष्मी, परळ भागांत रस्ते आणि पदपथांची सफाई केली जाणार आहे. हा प्रयोग अन्य विभागांमध्येही होण्याची शक्यता आहे.

गारगाई, पिंजाळ, दमणगंगा जल प्रकल्पांना गती, प्लास्टीकचा समावेश असलेल्या मटेरियलपासून रस्ते, पाणी साचण्यातून सुटका होण्यासाठी उद्यानांखाली भूमिगत तलाव, आरेतील भव्य प्राणी-पक्षी उद्यानासह कोस्टल रोड, मियावकी वने आदींसाठी तरतूद केली जाणार आहे.

२०१६-१७ मध्ये ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्पातील फुगवटा काढून, तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी २०१७-१८ मध्ये २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प मांडला. २०१८-१९ मध्ये ३० हजार ६८५.९९ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.

पालिकेला या वर्षी मालमत्ता करातून ५८४४.९४ कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज होता. मात्र, उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २३९४.३८ कोटी म्हणजे तब्बल ५० टक्के कमी वसुली झाली आहे.

नाइटलाइफसाठी जुहू, गिरगाव चौपाटी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी सी-फेस, बँडस्टँड, नरिमन पॉइंट, एनसीपीए अशा ठिकाणी फूड ट्रक योजना सुरू करण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईत मियावाकी वनांसह उद्याने, मैदाने आणि पर्यटनस्थळांचे विकास-संवर्धन करण्यात येणार आहे. यामध्ये ‘आरे’मध्ये प्रस्तावित असणाऱ्या जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालयाचाही समावेश असू शकतो.

Web Title: Scissors to cover rising costs; Mumbai Municipal Corporation budget today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.