शाळांना ईदच्या सुट्टीवरून सावळागोंधळ; शिक्षण उपसंचालक आणि पालिका शिक्षण विभागाचे वेगवेगळे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:46 IST2025-09-05T05:45:34+5:302025-09-05T05:46:02+5:30
५ सप्टेंबरकरिता काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केली असल्याने खासगी शाळांच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

शाळांना ईदच्या सुट्टीवरून सावळागोंधळ; शिक्षण उपसंचालक आणि पालिका शिक्षण विभागाचे वेगवेगळे आदेश
मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालकांनी ‘ईद ए मिलाद’निमित्ताने ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबरला शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. तर, पालिकेच्या शिक्षण विभागाने ५ व ८ सप्टेंबर दोन्ही दिवशी सुट्टीचा पर्याय घेतला. या गोंधळात भर टाकत खासगी शाळांनी उपसंचालकांच्या आदेशानुसार ८ ला सुट्टी दिली आहे. हा ‘सुट्टीगोंधळ’ चर्चेचा विषय ठरला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ ऐवजी ८ सप्टेंबर रोजी ईदचा जुलूस काढण्याचे मुस्लीम समुदायाने निश्चित केले. त्यानंतर शासनाने ८ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मात्र, शिक्षण उपसंचालकांनी ५ सप्टेंबर रोजी खासगी शाळा सुरू राहतील आणि ८ सप्टेंबरला त्या बंद राहतील, असा आदेश जारी केला. मात्र, ५ सप्टेंबरकरिता काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केली असल्याने खासगी शाळांच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. पालिका शाळांच्या सोमवार, ८ सप्टेंबरच्या सुट्टीसाठी भरपाई वर्ग घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
शासनाने ५ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली. तर, शिक्षण उपसंचालकांनी त्याच दिवशी खासगी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गोंधळात भर पडणार आहे. - तानाजी कांबळे, अध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना