राष्ट्रगीत म्हणून दाखव! बांगलादेशीची पोलखोल; अधिकृत कागदपत्रांशिवाय वास्तव्यप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 06:47 IST2025-03-08T06:47:35+5:302025-03-08T06:47:40+5:30
अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात बांगलादेशी ओळख लपवून वावरत होता. पोलिसांनी चौकशीदरम्यान भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सांगितले असताना त्याला ते गाता आले नाही. त्याचे पितळ उघडे पडले.

राष्ट्रगीत म्हणून दाखव! बांगलादेशीची पोलखोल; अधिकृत कागदपत्रांशिवाय वास्तव्यप्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतात अधिकृत कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या अल्ताफ खान (२४) या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी चौकशीदरम्यान भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सांगितले असताना त्याला ते गाता आले नाही. त्याचे पितळ उघडे पडल्यामुळे डी.एन. नगर पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली आहे.
अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात खान ओळख लपवून वावरत होता. पोलिस भरतीवेळी चौकशीत सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची भाषा ही पश्चिम बंगालमधील नागरिकांपेक्षा थोडी वेगळी वाटल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. तो बांगलादेशी असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली.
त्याच्या भारतीय नागरिकत्वाबाबत तपास अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यावेळी भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सांगितले. त्यावेळी ते आपल्याला येत नसल्याचे उत्तर खान याने दिले. त्यानंतर भारतीय असल्याचे कोणतेही एक ओळखपत्र दाखवण्यास सांगितले असता, तो ते सादर करू शकला नाही. अखेर आपण बांगलादेशी असल्याची कबुली त्याने डी.एन. नगर पोलिसांसमोर दिली. त्याच्याविरोधात परकीय नागरिक आदेश कलम १४,३(१) आणि ६ अंतर्गत गुन्हा नोंदवला.