Savarkar's History Drawn by Students; State level painting competition | विद्यार्थ्यांनी रेखाटला सावरकरांचा इतिहास; राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांनी रेखाटला सावरकरांचा इतिहास; राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

मुंबई : दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला मुंबईसह ठाणे, विरार, नवी मुंबई, रायगड, पुणे, अहमदनगर आदी ठिकाणांहून २ हजार ५०० पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. जुहू, खार, मालाड, वरळी, प्रभादेवीसोबतच पुणे, अहमदनगरमधून दिव्यांग स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग वाखाणण्याजोगा होता. स्वातंत्र्यवीरांच्या विविध प्रसंगांवर आधारित आणि सामाजिक संदेश देत स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण चित्रे रेखाटली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समाजक्रांतीतील दलितोद्धार, क्रांतिकार्य, त्यांच्या जीवनातील भारावलेले प्रसंग, दहशतवाद्यांशी भारतीय सैनिकांची झुंज, अवयवदान, डिजिटल भारत, वाहतूक नियम, पूरग्रस्तांना मदत, प्लॅस्टिक पुनर्वापर, मैदानातून हरवली पाखरे आदी विषयांवर स्पर्धकांनी सर्जनशीलपणे चित्रे रेखाटली. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. या वेळी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची मुख्य उपस्थिती होती.

स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांकडून जाज्वल्य राष्ट्रभक्तीला प्रतिबिंबित होत असलेल्या चित्रांची निर्मिती होते. स्पर्धकांची चित्रे दर्जेदार असून निकाल करताना परीक्षकांचीच कसोटी लागते. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येक जण उत्साहाने त्यात सहभागी होत असतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंगांनाही स्पर्धकांकडून विशेष स्थान दिले जाते. स्पर्धेदरम्यान कार्टूनिस्ट कंबाइन संस्थेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार संजय मेस्त्री, नगरसेवक अरविंद भोसले, म्हाडाचे सदस्य भाऊ कोरगावकर, माझगाव डॉकचे अधिकारी ए. के. चांद आदी मान्यवरांचा सत्कार स्मारकांच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि स्पर्धाप्रमुख यांनी केला.

Web Title: Savarkar's History Drawn by Students; State level painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.