साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:08 PM2024-03-20T17:08:28+5:302024-03-20T17:10:45+5:30

साताऱ्यातून महायुतीच्या तिकिटावर नक्की कोण निवडणूक लढवणार, याबाबत प्रश्नचिन्ह असून उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

satara lok sabha seat whether to get candidacy or not Udayanraje met devendra Fadnavis | साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

साताऱ्यात पेच, उमेदवारी मिळणार की नाही?; उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असली तरी महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. काही जागांवरून दोन्हीही आघाड्यांमध्ये तिढा निर्माण झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमदेवार श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा ही जागा महायुतीच्या जागावाटपात आपल्यालाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे साताऱ्यातून महायुतीच्या तिकिटावर नक्की कोण निवडणूक लढवणार, याबाबत प्रश्नचिन्ह असून उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काल रात्री उदयनराजेंनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते.

अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारीची मागणी होत असली तरी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं आहे. त्यामुळे या जागेवर आपल्यालाच उमदेवारी मिळावी, असं उदयनराजेंचं म्हणणं आहे. मात्र भाजपने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवार यादीत उदयनराजेंचा समावेश नव्हता. त्यामुळे स्वत: उदयनराजे यांच्यासह त्यांचे समर्थक कमालीचे नाराज असल्याचं दिसत आहे. भाजपकडून लवकर उमेदवारी जाहीर केली नाही तर वेगळा निर्णय घ्यावा, असा आग्रह समर्थकांकडून उदयनराजेंकडे धरला जात आहे. त्यामुळे काल फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत उदयनराजे यांना नेमकं काय आश्वासन मिळालं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उदयनराजे समर्थकांना आश्वस्त करत महाजन काय म्हणाले?

उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांची समजूत काढण्यासाठी नुकतीच भाजप नेते गिरीश महाजन यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं की, "पश्चिम महाराष्ट्रात तीन पक्षांमध्ये उमेदवारीवरून वाटाघाटी सुरू आहेत. चर्चेतून लवकर योग्य तो मार्ग निघेल. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची उमेदवारी निश्चित होईल. पार्लमेंटरी बोर्ड वरिष्ठांशी चर्चा करत असून, लोकसभेची तिसरी यादी जाहीर होईल. भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत आकांडतांडव केले होते. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. उदयनराजे यांची उमेदवारी आम्ही नाकारलेली नाही. त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे वलय वेगळे असून, त्यांची पक्षालाच अधिक गरज आहे. सध्या महाराष्ट्रात मित्रपक्षाचे सरकार आहे. तिघांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे चर्चेतून योग्य तो मार्ग निघेल," असं महाजन यांनी म्हटलं होतं.

Web Title: satara lok sabha seat whether to get candidacy or not Udayanraje met devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.