संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:54 IST2025-12-16T12:54:03+5:302025-12-16T12:54:10+5:30
Sanjay Raut News: भविष्यात लोकसभा व विधानसभेच्याही निवडणुका येणार आहेत, हे लक्षात ठेवा, एवढेच मी त्यांना सांगेन, असा इशारा संजय राऊतांनी काँग्रेसला दिला.

संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
Sanjay Raut News: आम्ही मुंबईसह २९ महानगर पालिका निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहोत. पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे व नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत. इतर महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरचे नेते निर्णय घेतील. ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला माहिती आहे रेहमान डाकू कोण आहे? कुणाला मुंबई लुटायची आहे? त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत? उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास व उत्साह निर्माण झाला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवतीर्थ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भले तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा, पण आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढवणार आहेत. ही लढाई २९ महापालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई मुंबईची होती. त्या बलिदानाची तयारी आमची आजही आहे. रहमान डकैत कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. येत्या आठवडाभरात शिवसेना-मनसे युतीची घोषणा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊतांनी दिला काँग्रेसला थेट इशारा
या क्षणी तरी काँग्रेस आमच्यासोबत आहे, असे मला दिसत नाही. बिहारच्या निकालांनंतर त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे. खरे तर आमच्यासोबत या लढाईत असायला हवे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो. पण त्यांनी ही बाब स्थानिक पातळीवरील नेत्यांवर सोडली आहे. त्या स्थानिक नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, वेगळी चूल मांडून भाजपाला मदत होईल अशी भूमिका कुणीही मुंबईच्या निवडणुकीत घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा व विधानसभेच्याही निवडणुका येणार आहेत हे लक्षात घ्या एवढेच मी त्यांना सांगेन, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
दरम्यान, या निवडणुकीत पैशांचे वाटप प्रचंड होणार आहे. १५ लाखांची मर्यादा मुंबईत दिली आहे. सत्ताधारी पक्ष १५ लाखांवर थांबणार आहे हे निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकेल का? ज्या सत्ताधारी पक्षांनी नगरपालिकेत, नगरपंचायतीत एका एका ठिकाणी १००-१५० कोटी खर्च केलेत. नगरसेवक फोडण्यासाठी २-२ कोटी खर्च केलेत. ते तिन्ही पक्ष १५ लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का? निवडणूक आयोग त्यासाठी कुठली यंत्रणा लावणार आहे? मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.