Sanjay Raut: आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु; संजय राऊतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 11:26 IST2021-11-02T11:25:55+5:302021-11-02T11:26:15+5:30
Sanjay Raut: दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला होता.

Sanjay Raut: आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु; संजय राऊतांचा इशारा
जे लोक दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या बाता करताहेत त्यांना एक सांगतो आम्ही जर बॉम्ब फोडले तर या लोकांना घरात काय बाथरुममध्ये तोंड लपवून बसावं लागेल, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केलेली अटक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागानं टाकलेले छापे यासंदर्भात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रावर जोरदार निशाणा साधला. यावेळी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याच्या फडणवीस यांच्या दाव्यावरही राऊत यांनी भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "बॉम्ब फोडण्याची भाषा करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आम्ही जर बॉम्ब फोडले तर घरात काय बाथरुममध्ये तोंड लपवावं लागेल असे गौप्यस्फोट करु. पण आम्ही तसं करणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. राजकाराणालाही काही मर्यादा असतात आणि त्या ओलांडायच्या नसतात. महाराष्ट्राची अशी घाणेरडं राजकारण करण्याची संस्कृती नाही", असं संजय राऊत म्हणाले.
"जेव्हा यांच्यावर आरोप होतात तेव्हा यांचं कुटुंब ते कुटुंब आणि मग आमचं कुटुंब, मुलं, बायका काय रस्त्यावर पडल्यात का? त्यामुळे यांनी आम्हाला राजकारणाची संस्कृती शिकवू नये", असंही संजय राऊत म्हणाले.
भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का?
अनिल देशमुख यांच्या अटकेसोबतच आज अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. "मला आज कळालं की अजित पवारांच्याही मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. पण मला एक कळत नाही. भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? त्यांनी काय सगळे टॅक्स भरलेत का? ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत यामागचं खरं कारण सर्वांना माहित आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका, असं संजय राऊत म्हणाले.