“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:07 IST2024-09-30T13:04:21+5:302024-09-30T13:07:45+5:30
Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला सडेतोड शब्दांत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
Sanjay Raut News: बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
पत्रकारांशी बोलताना, हे लोक दसरा मेळावा घेणार आहेत. मुंबईत घेऊ नका. तुमची दुसऱ्या दसरा मेळाव्याची जागा सूरत आहे. तुमच्या शिवसेनेचा अडीच वर्षांपूर्वी सूरतमध्ये जन्म झाला आहे. त्यामुळे ते दोन ठिकाणी दसरा मेळावा घेऊ शकतात. त्यांनी सूरत आणि गुवाहाटी येथे कामाख्या मंदिरासमोर किंवा रॅडिसन हॉटेलमध्ये दसरा मेळावा घ्यावा. सुरत सर्वांत उत्तम आहे, या शब्दांत संजय राऊतांनी खोचक टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांना स्वतःला ट्विट करता येते का?
मुख्यमंत्र्यांना स्वतःला ट्विट करता येते का? आम्ही त्यांना ओळखतो. ट्विट करायला जी माणसे ठेवली आहेत त्यांना नीट ट्रेनिंग द्या. कटोरी घेऊन दिल्लीच्या दरबारात आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षापासून कोण आहे? उद्धव ठाकरेंचे काय असेल ते आम्ही पाहू. मोदी आणि शाह यांची भांडी घासायला गुजरातच्या दरबारी सुरतला अडीच वर्षापूर्वी कोण गेले होते? तुम्ही दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उंबरठ्यावरचे पायपुसणे आहात. मोदी आणि शाहांचा हात तुमच्या डोक्यावरून जाईल, त्या दिवशी तुमची महाराष्ट्रात कचऱ्याइतकी किंमत राहणार नाही. ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही या पदावर आज पोहोचलेला आहात हे लक्षात घ्या. ठाकरेंवर बोलताना आपला भूतकाळ काय होता हे विसरू नका, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, यंदा शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदान येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून दोन्ही मैदानांचे दसऱ्याच्या दिवशी आरक्षण करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी शिंदे गटाने केली नसल्याची माहिती मिळत आहे.