“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:01 IST2025-12-23T10:59:28+5:302025-12-23T11:01:41+5:30
Sanjay Raut News: जागावाटपावरून ठाकरे बंधूंमध्ये कोणताही विसंवाद नाही. दोन्ही पक्षाच्या युती घोषणेबाबत कुणी चिंता करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Sanjay Raut News: कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे. मनसे आणि शिवसेना यांच्यात युतीविषयी संभ्रम नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेल्या आहेत. कार्यकर्त्यांमधील मनोमिलन आम्ही स्वतः अनुभवत आहोत. ठाकरे बंधूंमध्ये युती झालेलीच आहे. जागावाटपावर शेवटचा हात काल रात्री फिरला. आता राज आणि उद्धव ठाकरे यांनी जागावाटप आणि अन्य संदर्भात केवळ घोषणा करणे बाकी आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, घोषणा कधी करायची याबाबत आम्ही निर्णय घेऊ. उमेदवारी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्हाला आता वेगाने काम करावे लागेल. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर येथेही जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दोन्ही पक्षात जागावाटपावरून तणाव, रस्सीखेच, विसंवाद नाही
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच आम्ही सगळे एकमेकांच्या संवादात आहोत. जागावाटप झाल्याशिवाय कोणतीही युती जाहीर होत नाही. आमच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आहोत. दोन्ही पक्षात जागावाटपावरून कोणताही तणाव, रस्सीखेच, विसंवाद नाही. दोन्ही पक्षांमध्ये एका कोणत्या जागेसाठी कोणी अडून बसले आहेत, असे अजिबात झालेले नाही, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले. वरळी येथे दोन भाऊ एकत्र आले, तेथेच युतीची घोषणा झाली. घोषणेबाबत अन्य कुणी चिंता करू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, आमचे जागावाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेले आहे. निष्ठावान लोकांची उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात, एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही. महाविकास आघाडी तुटलेली नाही. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही निर्णय घ्यावे लागतात. शिवसेना आणि मनसे युती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तेव्हा आम्ही १०० चा आकडा १०० टक्के पार करू, असा मोठा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला.