Sanjay Raut : "सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का, कारण...": संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:35 IST2025-01-16T11:34:24+5:302025-01-16T11:35:50+5:30
Saif Ali Khan And Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं म्हटलं आहे.

Sanjay Raut : "सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का, कारण...": संजय राऊत
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं म्हटलं आहे.
"राज्याची ९० टक्के सुरक्षा, पोलीस हे महायुतीचे आमदार, फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत. सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता" असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. सरकार फक्त निवडणुका, सभा, संमेलन, उत्सव, पंतप्रधानांचं स्वागत, शिबीर याच्यातच गुंतून पडलं आहे. त्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही."
"महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाही"
"मंगळवारी देशाचे पंतप्रधान मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार आणि याच दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला. पंतप्रधान मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारायला हवा. आम्ही काही भाष्य केलं की, त्यांना यातना होतात. पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाही. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसताहेत."
"सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का"
"सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता. पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर एक तास घालवला होता. त्यानंतर सैफवर हल्ला झाला. या राज्यामध्ये कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्कील झालं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे समजून घेतलं पाहिजे."
" गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर यांना सुरक्षा"
"राज्याची ९० टक्के सुरक्षा, पोलीस हे महायुतीचे आमदार, फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत. आमचा उपशाखाप्रमुख फोडला तर त्याला दोन गनर, उपतालुकाप्रमुख फोडला तर त्याला एक गनर आणि जिल्हाप्रमुख फोडला तर त्याला ५ गनर दिले जातात. सामान्य माणसाला सुरक्षा नाही. पण गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर यांना सुरक्षा आहे."
"सरकार उघडं पडलं"
"सैफ अली खानला सरकारने पद्मश्री दिलेला आहे. त्यालाही मुंबईत सुरक्षित राहता येत नाही हेच या हल्ल्यावरून दिसलं. याचा पोलीस तपास करतील, चोराला पकडतील. पण असं किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, हल्ला करणं ही भीती आज कुणाच्याही मनात राहिलेली नाही. यातूनच दुर्दैवाने सैफवर गंभीर हल्ला झाला आणि त्यामुळे सरकार उघडं पडलं" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.