संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:28 IST2025-11-05T19:27:59+5:302025-11-05T19:28:40+5:30
नुकतेच संजय राऊत यांनी तब्येतीबाबत माहिती देत पुढील काही महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याचं सांगितले होते.

संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत यांना भांडुपच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होणार आहेत. अलीकडेच संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती.
संजय राऊत गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. नुकतेच संजय राऊत यांनी तब्येतीबाबत माहिती देत पुढील काही महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याचं सांगितले होते. संजय राऊत म्हणाले होते की, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असे आवाहन राऊत यांनी पत्राच्या शेवटी केले होते.
पंतप्रधान मोदींनीही केले होते ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संजय राऊतांच्या पोस्टची दखल घेतली होती. पंतप्रधान मोदी यांनी संजय राऊतांचे पोस्ट रिट्विट करून त्यांना लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे. मोदी म्हणाले होते की, संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलं. त्यावर राऊतांनीही पंतप्रधानांचे आभार मानले होते.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही राऊतांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे असं आदित्य यांनी म्हटलं होते. संजय राऊत हे शिवसेनेतला महत्त्वाचा चेहरा आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे असो या सगळ्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असा संजय राऊत यांचा लौकिक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळातच राऊत यांना प्रकृतीच्या कारणास्तव लांब राहावे लागत आहे.