“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:07 IST2025-12-23T12:06:28+5:302025-12-23T12:07:35+5:30
Sanjay Raut News: नक्कीच काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. परंतु, मुंबईत कुठेही कटुता न ठेवता निवडणूक लढू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Sanjay Raut News: बंड कुठे होत नाही? पण शिवसेना आणि मनसेमध्ये असे काही होईल, असे वाटत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. जागावाटपाची आमची टीम आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. काँग्रेस हा विषय नक्कीच संपलेला आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की, कुठेही कटुता न येता मुंबई मनपा निवडणूक लढू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची युती, युतीची घोषणा, जागावाटप अशा मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. परंतु, स्थानिक पातळीवर काँग्रेसने एकला चलो रे असा नारा दिला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नक्कीच काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. परंतु, मुंबईत कुठेही कटुता न ठेवता निवडणूक लढू आणि भविष्यात निवडणूक निकाल झाल्यानंतर आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकांना कशी मदत करता येईल, याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
आम्ही १०० चा आकडा १०० टक्के पार करू
मुंबई मनपा निवडणूक निकालानंतर काँग्रेसची मदत घेतली जाईल का, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मग काय काँग्रेस भाजपाला मदत करणार का, काँग्रेसची लढाई हीदेखील राष्ट्रद्रोही, धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आहे. काँग्रेसला नगर पंचायत निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले आहे आणि आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसला जर काही चांगला जागा मिळाल्या आणि आम्हाला गरज लागली, तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण, शिवसेना आणि मनसे युती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तेव्हा आम्ही १०० चा आकडा १०० टक्के पार करू, असा मोठा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी कायम, अजिबात तुटलेली नाही
काँग्रेस आमचे सहकारी आहेत. स्थानिक पातळीवर आमची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी अजिबात तुटलेली नाही. महाविकास आघाडी कायम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डावे पक्ष हे सगळे आम्ही अजून एकत्र आहोत. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील, तर काका-पुतणे एकत्र का येऊ नयेत? अजित पवारांशी युती म्हणजे भाजपाला मदत असे आम्ही म्हणत असलो, तरी याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणे झालेले आहे. अशा प्रकारे काही घडेल, म्हणजे भाजपाशी हातमिळवणी केली जाईल, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे, असे संजय राऊत म्हणाले.