ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:05 IST2025-12-23T15:03:13+5:302025-12-23T15:05:06+5:30
MNS Sandeep Deshpande PC News: मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
MNS Sandeep Deshpande PC News: उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून मातोश्री आणि शिवतीर्थावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. १९ वर्षानंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ठाकरे बंधूंच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हीच घोषणा आता उद्या १२ वाजता होणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जागावाटपाबाबत मोठे विधान केले आहे.
पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, युतीची घोषणा काय करायची, ते आता ओपन सीक्रेट झाले आहे. अजूनही आमचे नेते काही जागांबाबत चर्चा करत आहेत. युती तर झालेलीच आहे. होण्याच्याच मार्गावर आहे. राज ठाकरे योग्यवेळी याबाबत घोषणा करतील. युती कधी करायची, घोषणा कधी करायची, याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील. जागावाटपाची चर्चा अजून सुरू आहे. ती झाली की, सांगू. कोणत्याही जागेवर तिढा नाही. तुमचा कोणता कार्यकर्ता चांगला आहे, आमचा कोणता कार्यकर्ता चांगला आहे, याबाबत चर्चा होत राहते. डेटा गोळा केला जात आहे. डेटा एनालिसिस केला जातो. या गोष्टीला थोडा वेळ जाते. त्यामुळे त्यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?
मनसेला समाधानकारक जागा मिळतील का, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, मला असे वाटते की, शेवटी मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. ही लढाई आम्ही लढणार आहोत. त्यात जागा हा विषय असला, तरी चर्चा होत राहील. आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही. त्यांच्याकडूनही कोणी नाराज होणार नाही. मला वाटते की, मुंबईसाठी त्याग करायला सगळे जण तयार आहेत. बलिदान द्यायला सगळे जण तयार आहेत. परंतु, कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. काय परिणाम होऊ शकतात. कोणत्या वॉर्डात कोण येऊ शकते. या सगळ्या गोष्टी चर्चेचा भाग आहेत. ती चर्चा आमची नेतेमंडळी करत आहेत, असे संदीप देशपांडे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच आम्ही सगळे एकमेकांच्या संवादात आहोत. जागावाटप झाल्याशिवाय कोणतीही युती जाहीर होत नाही. आमच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आहोत. दोन्ही पक्षात जागावाटपावरून कोणताही तणाव, रस्सीखेच, विसंवाद नाही. दोन्ही पक्षांमध्ये एका कोणत्या जागेसाठी कोणी अडून बसले आहेत, असे अजिबात झालेले नाही. वरळी येथे दोन भाऊ एकत्र आले, तेथेच युतीची घोषणा झाली. घोषणेबाबत अन्य कुणी चिंता करू नये. आमचे जागावाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेले आहे. शिवसेना आणि मनसे युती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तेव्हा आम्ही १०० चा आकडा १०० टक्के पार करू, असा मोठा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला.