Maharashtra Marathi News: 'एक खोक्याभाई काय घेऊन बसला आहात, विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरले आहेत', या राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर भाजपचे नेते आशिष शेलारांनी खोचक टीका केली. शेलारांनी केलेल्या टीकेला मनसेचे मुबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिले. शेलारांना झोलार असं संबोधत मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून किती वेळा राज ठाकरेंकडे भीक मागायला आला होतात?, असा सवाल करत देशपांडेंनी शेलारांना डिवचलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमधील खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेवरून सरकारला लक्ष्य केले होते. रविवारी (२३ मार्च) मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर आशिष शेलारांनी टीका केली होती.
संदीप देशपांडे म्हणाले, मुंबई फिरणं मुश्कील होईल
आशि शेलार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, "काल (23 मार्च)भारतीय जनता पक्षाचे एक नेते झोलार हे राज ठाकरेंबद्दल काहीतरी बरळत होते. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की, स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळा भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आलात?", असा सवाल करत देशपांडेंनी शेलारांना घेरलं.
"२००९ ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली राज ठाकरेंकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका. जर आम्ही बोलायला लागलो ना, तर झोलार तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्कील होईल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा", असा इशारा देशपांडेंनी शेलारांना दिला.
आशिष शेलार राज ठाकरेंबद्दल काय बोलले होते?
राज ठाकरे यांच्या विधानावर शेलारांनी खोचक शब्दात टीका केली होती. शेलार म्हणालेले, 'एखादे वाक्य आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी करणे, आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेण्यासाठी बोलणे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे."
"महाराष्ट्राच्या विधानसभेत जे लोक काम करत आहेत, ते निवडून आले आहेत. त्या लोकांना जनतेने निवडून दिलेले आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करत बसतात", अशी टीका शेलारांनी राज ठाकरेंवर केली होती.