Samana Editorial on Aligadh Girl Murder | ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात; अलीगडच्या घटनेवरुन शिवसेनेचा संताप  
‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात; अलीगडच्या घटनेवरुन शिवसेनेचा संताप  

मुंबई - अलीगडच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते. कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार सुरूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आली आहे. 

सत्ताधारी म्हणून निवडून आले आहेत त्या लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळणे गरजेचे आहे. मोदी व शहा अशा लोकांना वारंवार समज देत असतात तरीही ही मंडळी भरकटलेली का असतात? बलात्काराच्या एका आरोपीस भाजप खासदार साक्षी महाराज खास जेलमध्ये जाऊन भेटले. त्यावर उत्तर प्रदेशात आता हंगामा सुरू आहे. अलीगडमधील घटनेने मानवतेस कलंक लागला व समाजाची मान पुन्हा शरमेने खाली गेली. त्या अभागी मुलीची तडफड आणि किंकाळी आमचे मन अस्वस्थ करीत आहे असं भाष्य सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर अलीगडमध्ये घडलेल्या भयंकर प्रकाराकडे पाहायला हवे. 
  • ‘‘मी भयभीत आहे, अस्वस्थ आणि निराश आहे. हे ते जग नाही, जे आम्ही आमच्या मुलांसाठी निर्माण करू पाहत होतो,’’ अशी भावना अक्षय कुमारने व्यक्त केली आहे. हीच संपूर्ण देशाची भावना आहे. 
  • अमानुष आणि निर्घृण हे शब्द कमी पडतील अशा पद्धतीने अडीच वर्षांच्या मुलीचे जीवन संपवले. पोलीस महासंचालकांच्या घराच्या बाहेरून अपहरण होते व पोलीस अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह घेऊन येतो. हे असे उत्तर प्रदेशातील ‘जंगलराज’ असल्याचे अखिलेश यादव म्हणतात, पण या जंगलराजचे खरे जन्मदाता आणि पोशिंदे आपणच आहात. 
  • अतिरेकी व गुन्हेगारांना सरळ गोळ्या घालता येतात, पण विकृत माथेफिरू आपल्याच अवतीभोवती लपलेले असतात व ते संधी साधून गुन्हे करतात. हे देशभरात, जगभरात सुरू असले तरी कायद्याचा धाक राहिलेला नाही हे सत्य नाकारता येणार नाही. 
  • काँगेस राजवटीत ‘निर्भया कांड’ घडले तेव्हा ज्यांनी संसद चालू दिली नाही व महिला अत्याचाराविरोधात सरकारला कठोर कायदे करायला भाग पाडले ते सर्व लोक आज सत्तास्थानी आहेत. त्यामुळे आजच्या सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी मोठी आहे. लोकांच्या मनात अशा प्रकाराने अस्वस्थता निर्माण होते. 
  • अलीगडमध्ये एका लहान मुलीची हत्या होते. ती देशाची मुलगी आहे ही भावना महत्त्वाची. देशातल्या प्रमुख लोकांनी या घटनेचा धिक्कार केला. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांवर दबाव वाढला. 
  • पोलिसांमधील बेफिकिरी व शिथिलतासुद्धा असे गुन्हे करणाऱ्यांना बळ देत असते. अलिगडच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते. कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार सुरूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात
     

Web Title: Samana Editorial on Aligadh Girl Murder
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.