सॅल्यूट 'खाकी'ला ! वेदनाग्रस्त प्रवाशाला खांद्यावर घेऊन पोलीस शिपाई रुग्णालयात पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 19:54 IST2020-02-07T19:52:40+5:302020-02-07T19:54:10+5:30
शुक्रवार सकाळी सकाळच्या 1st शिफ्टसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी

सॅल्यूट 'खाकी'ला ! वेदनाग्रस्त प्रवाशाला खांद्यावर घेऊन पोलीस शिपाई रुग्णालयात पोहोचला
मुंबई - पोलीस म्हटलं की तिरस्कार अन् सर्वसामान्यांना त्रास देणारी यंत्रणा असाच आपला समज असतो. मात्र, पोलिसांमधील माणसाचेही अनेकदा दर्शन घडते. या खाकी वर्दीतही माणूसकी लपल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियातून अनेकदा या गोष्टी समाजासमोर येतात. आता, कुर्ला लोकल रेल्वे स्थानकावरील रेल्वेपोलिसांने दाखवलेल्या माणुसकीचा व्हिडीओ समोर आला आहे.
शुक्रवार सकाळी सकाळच्या 1st शिफ्टसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी माणूसकीचं दर्शन घडवलं. घाटकोपर रेल्वे स्टेशन येथे फलाट क्रमांक 4 वर प्रवाशी प्रकाश बाबासाहेब गच्छे, राह. घाटकोपर यांच्या अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना त्रास सुरू झाला होता. या वेदना सहन होत नसल्याने त्यांनी आरडाओरडा चालू केल्याने कर्तव्यावरील रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी, हमाल उपल्ब्ध नसल्याने पोलिस शिपाई 3297 धनंजय गवळी यांनी आपल्या खांद्यावर उचलुन घेऊन सहकर्मचारी यांच्यासह त्यास राजेवाडी हॉस्पीटल येथे दाखल केले. तसेच, पुढील औषधोपचार करून त्यांना ICU मध्ये ऍडमिटही करून घेतले. खाकी वर्दीतली माणूसकी दर्शविणाऱ्या या पोलीस शिपायाचे गच्छे कुटुंबीयांनी खूप आभार मानले.
कुर्ला रेल्वे स्थानकावरील पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीत पोलीस हवालदार/232 रविंद्र सोनवणे, पोलीस शिपाई/2397 धनंजय गवळी, महिला पोशि/1714 प्रतिभा अभंग, 2559 रूपाली निमसे यांनी कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या संवेदनशीलपणाचं इतर प्रवाशांकडून मोठं कौतुक होत आहे. तसेच, सोशल मीडियावरुनही पोलिसांच्या माणूसकीचा व्हिडीओ विविध कॅप्शन देऊन शेअर होत आहे.