वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:49 IST2023-02-07T16:48:41+5:302023-02-07T16:49:47+5:30
आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली
मुंबई - वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवा, तुम्ही कसे जिंकून येता हे बघतोच असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजनंतर शिंदे गटाने आता आदित्य ठाकरेंविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी शिंदे गटाची चर्चा सुरू आहे. त्यात वेगवेगळी नावे पुढे येत आहे.
वरळीतून बाळासाहेबांचा नातू निहार ठाकरे यांच्या नावाचीही चाचपणी सुरू असल्याचं पुढे आले आहे. मात्र याबाबत पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न केला असता त्यांनी वरळीत काहीही होऊ शकते असा दावा केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरेंविरोधात निहार ठाकरेच का? आदित्य ठाकरेंविरोधात सचिन आहिर, सुनील शिंदे होऊ शकत नाही का? कुणीही होऊ शकते. काहीही होऊ शकते. सचिन आहिरची ताकद आहे. सुनील शिंदेची ताकद आहे. ते निवडणूक लढवू शकतात. ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे. अजून १ वर्ष बाकी आहे. बघा काय होते असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत संजय राऊत आगीत तेल घालायला हुशार आहे. आदित्य तुम आगे बढो असं म्हणणार आणि कधी तोंडावर पाडेल हे आदित्यलाही कळणार नाही. मुंबईची पोलीस वसाहत त्यावर अनेक वर्षापासून अन्याय झाला. गेले १ महिना ते मुख्यमंत्र्यांना ते त्या भागात येण्यासाठी आवाहन करत होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आज कार्यक्रमाला वरळीला जातायेत असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय देऊन पहिली पायरी चढली
आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. शिरसाट म्हणाले की, वरळी हा त्यांचा मतदारसंघ नाही. सचिन अहिर, सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेऊन ते पहिली पायरी चढलेत हे ते विसरलेत. म्हणून त्यांच्या आव्हानाला महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणात एक निवडणूक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असे त्यांना वाटते. आम्ही अनेक निवडणुका जिंकल्यात तरी आमच्यात हा अहंकार आला नाही असं त्यांनी सांगितले.