Rohit Pawar: धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:29 IST2022-05-05T15:26:15+5:302022-05-05T15:29:32+5:30
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Rohit Pawar: धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) हे भाजपवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्य सरकारची बाजू मांडताना ते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य करत असतात. आता, रोहित यांनी मनसेकडून सुरू असलेल्या भोंगा वादावरुन मनसेप्रमुखराज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी टिका केली.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सरकारला अल्टीमेटम देऊन मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. यातच शिवसेनेवर निशाणा साधण्यासाठी राज यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये बाळासाहेब भोंगा आणि रस्त्यावरील नमाजाविषयी बोलत आहेत. राज यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बाळासाहेबांचं ऐकणार आहेत का, बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवाराचं असा सवालही राज यांनी विचारला होता. राज यांच्याकडून सुरू असलेल्या प्रक्षोभक भाषणावरुन रोहित पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे.
धर्म, निष्ठा, श्रद्धा हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत. त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. पण त्याचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही रोखलं पाहिजे. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावर आवाज उठवण्याची आज अधिक गरज आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 5, 2022
कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरु नये - अजित पवार
जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही नोटीस पाठवून खबरदारी घेतली. कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरू नये. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सरकार कायदा व नियमांवर चालत असतं. सर्व धार्मिक स्थळांना समान नियम लागू होईल. यूपीत अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वत:हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. राज्यात जितकी धार्मिक स्थळ आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.