"अधिवेशनात अपघातावर न बोलण्यासाठी तटकरे-पटेलांनी आमदारांना गप्प केलं"; रोहित पवारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:19 IST2026-03-25T13:04:23+5:302026-03-25T13:19:49+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला आहे.

"अधिवेशनात अपघातावर न बोलण्यासाठी तटकरे-पटेलांनी आमदारांना गप्प केलं"; रोहित पवारांचा आरोप
Rohit Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता एका अत्यंत गंभीर वळणावर आले आहे. या प्रकरणाचा तपास रोखण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात होत असल्याचा ठपका ठेवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी थेट कर्नाटक गाठले. बंगळुरू पोलिसांनी याप्रकरणी झीरो एफआयआर दाखल केला असून, हा केवळ अपघात नसून एक मोठा गुन्हेगारी कट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अजितदादांच्या अपघाताबाबत वारंवार तक्रार करूनही महाराष्ट्रात एफआयआर नोंदवला जात नव्हता. अखेर रोहित पवारांनी २३ मार्च रोजी बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे झीरो नंबरने गुन्हा दाखल करून तो आता तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणाचा सखोल फौजदारी तपास करणे भाग पडणार आहे.
तटकरे आणि पटेलांवर 'मौन' बाळगल्याचा संशय आरोप
रोहित पवार यांनी सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर गंभीर निशाणा साधला. "सुनित्रा काकींना मला एवढेच सांगायचे की राजकारण खूप वंगाळ झालं आहे. अवतीभवतीचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मला जी माहिती मिळाली त्यानुसार अधिवेशनामध्ये अजित पवार यांच्या अपघाताविषयी एक-दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार बोलला नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताविषयी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीच सांगितलं होतं की अजिबात त्या ठिकाणी बोलायचं नाही. जय पवार सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते. ती का झाली नाही? जय पवार लढणारे आहेत पण त्याxचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का?," असा सवाल रोहित पवार यांनी केला.
"या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर असं वाटतं की कुठेतरी हा कट आधीच रचला गेला होता का? तसेच पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही लोकांचा हेतू आहे का. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की या ठिकाणी फौजदारी तपास व्हावा आणि त्यासाठी एफआयआर होणं महत्त्वाचं आहे जो काल बंगळुरुमध्ये झाला. तो झिरो एफआयआर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे ट्रान्सफर करण्यात आला आहे. आता हा तपास महाराष्ट्र पोलिसांकडे आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं गृह खातं आणि पोलीस काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावे लागेल. अजित दादांच्या घातपाताच्या मागे किंवा अपघाता मागे काय रणनीती होती, काय कटकारस्थान रचला गेले होते हे समोर आणायचं असेल तर फौजदारी तपास होणं महत्त्वाचं आहे," असेही रोहित पवार म्हणाले.