Aarey Colony : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती तातडीने हटवा: आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 18:58 IST2019-12-20T18:51:10+5:302019-12-20T18:58:07+5:30
Aarey Colony : आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांची विधानभवन पायऱ्यांवर निदर्शने

Aarey Colony : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती तातडीने हटवा: आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन
नागपूर दि. 20 डिसेंबर – अहंकारापोटी मुंबईकरांच्यामेट्रो कारशेडला दिलेली स्थगिती तातडीने उठवा अशी मागणी करीत आज माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांचे विधानभवन पायऱ्यांवर निदर्शने केली.
नागपूर मध्ये आज विधिमंडळाच्या कामकाजाला सुरवात झाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यासह आमदार राम कदम, अमित साटम, कालिदास कोळंबकर, पराग शहा, भारती लव्हेकर यांनी स्थगिती सरकार हाय हाय, मेट्रो कारशेडवरील स्थगिती तत्काळ उठवा, मुंबईकरांचे रोज होणारे पावणे पाच कोटींचे नुकासान थांबवा, मेट्रो कारशेड च्या कामाला स्थगिती देणाऱ्या सरकारचा निषेध असो, सामनात खूप.. सभागृहात चूप.. अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर आमदारांनी दणाणून सोडला.
याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अत्यंत वेगाने मेट्रोची कामे सुरु केली आणि ती पूर्णत्वास जात असतानाच नव्या आलेल्या ठाकरे सरकारने मेट्रो च्या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे मुंबईकरांचे रोज पावणे पाच कोटींचे नुकासान होत असून प्रकल्पाची किंमत वाढते आहे. प्रकल्पाला विलंब होत आहे. केवळ अहंकारा पोटी स्थगिती देण्यात आली असून ती तत्काळ उठवावी अशी मागणी यापूर्वी आम्ही सरकार कडे केली असून आम्ही या स्थगिती सरकारचे लक्ष वेधले आहे.