सभेच्या वर्षपूर्तीची आठवण सांगताना दगाबाजांवर बसरले रोहित पवार, व्हिडिओ शेअर

By महेश गलांडे | Published: October 18, 2020 01:36 PM2020-10-18T13:36:15+5:302020-10-18T13:37:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण, स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही.

Reminiscing about the anniversary of the satara rally of sharad pawar in rain, Rohit Pawar sat on the scammers, video share | सभेच्या वर्षपूर्तीची आठवण सांगताना दगाबाजांवर बसरले रोहित पवार, व्हिडिओ शेअर

सभेच्या वर्षपूर्तीची आठवण सांगताना दगाबाजांवर बसरले रोहित पवार, व्हिडिओ शेअर

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दिवसाची आज (१८ ऑक्टोबर) वर्षपूर्ती. होय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि विधानसभा निवडणुकीचा नूरच पालटला. उदयनराजेंच्या साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव करण्यातही या सभेनं मोठी भूमिका बजावली. तर,, सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळेच, राष्ट्रवादीला, नेत्यांना व कार्यकर्त्यांना आज या सभेची आठवण होत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहून राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका केलीय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात एकेक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने पक्षात घेतले होते. त्यामुळे हा किल्ला राखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले. वर्षापूर्वी १८ ऑक्टोबरला सातारा जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेने सर्वच राजकीय समीकरणे बदलून टाकली. या सभेच्या वर्षपूर्तीची आठवण महाराष्ट्राला होणार नसेल तर नवलच. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही तो पाऊस अन् ती सभा विसरता येणार नाही. त्यामुळेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या सभेच्या आठवणी जागवल्या जात आहेत. 

''आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना आहे.'', असे रोहित पवार यांनी म्हटलंय. तसेच, आपल्या फेसबुक पोस्टमधून रोहित पवारांनी, पडत्या काळात राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केलीय. 

''राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण, स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत. यातील काहींकडं पद जरुर आहे पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा हा डाव असू शकतो. काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही, असे म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर जबरी वार केलाय. यासोबतच, एक व्हिडिओ शेअर करता रोहित यांनी त्या नेत्यांचं नाव न घेत व्हिडिओतून चित्रीकरणाद्वारे त्यांचे चेहरे समोर आणले आहेत.  


 

Web Title: Reminiscing about the anniversary of the satara rally of sharad pawar in rain, Rohit Pawar sat on the scammers, video share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.