Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच'; संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप, राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:59 IST

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे हे ३ मार्च रोजी शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन चौकशी सुरु करण्यात आली होती. एक आरोपी निलेश पराडकर अजूनही फरार आहे. याप्रकरणी आता महत्वाची माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने निलेश पराडकरला फरार आरोपी दाखवलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील, असंही अशोक खरात याला वाटत होतं, त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. 

सदर प्रकरणी आता संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संदीप देशपांडे म्हणाले की, फरार असलेला आरोपी निलेश पराडकर ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे, आणि याच्याच कार्यालयात माझ्यावर हल्ला करण्याबाबत कट रचला होता. निलेश पराडकर हा कोणासोबत असायचा?, कोणासोबत फिरायचा?, त्यांच्या बॅनवर कोणाचे फोटो असायचे?, असा सवाल उपस्थित करत निलेश पराडकर राऊत बंधूसोबत असायचा. माझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोन करुन संदीप देशपांडे यांची चौकशी केली होती. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना ३ मार्च रोजी चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :संदीप देशपांडेसंजय राऊतसुनील राऊतमनसेउद्धव ठाकरे