Raju Shetty meeting with MNS Chief Raj Thackeray | राजू शेट्टी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शेतकरी प्रश्नावर मनसे-स्वाभिमानी संघटना एकत्र येणार? 
राजू शेट्टी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शेतकरी प्रश्नावर मनसे-स्वाभिमानी संघटना एकत्र येणार? 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपाला प्रचंड प्रमाणात यश मिळालं. ४८ पैकी ४१ जागा जिंकत महायुतीने आघाडीचा पराभव केला. या लोकसभेच्या निकालामुळे आगामी काळात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसने राज्यात केवळ १ जागा जिंकली तर राष्ट्रवादीने ४ जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर राज्यातील २०० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यासाठी बैठका घेत आहे. राजू शेट्टी यांनी दादर येथील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार उभे केले नसले तरी निवडणुकीच्या प्रचारात राज यांचीच चर्चा सर्वत्र सुरु होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला मते देऊ नका अशी भूमिका राज यांनी घेतल्यामुळे त्याचा फायदा विरोधकांना होईल असं बोललं जात होतं. अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मनसेच्या मतांचा फायदा होईल असं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्ष निकालात मनसेचा कोणताच परिणाम निकालांवर झाला नसल्याचं समोर आलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार हा प्रश्नच आहे. राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय शिजलं याची माहिती सध्या नाही. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतींवर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली असणार हे नक्की. 

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या मनसेने शेतकरी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. ठाणे येथे आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्यानंतर ठाण्यात मनसेकडून शेतकऱ्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात लोकांची मदत करावी अशा सूचना राज यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. पाणीटंचाई असणाऱ्या भागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून टॅँकरने पाणी पोहचविण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आगामी काळात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन आंदोलन छेडणार का याचं उत्तर काही काळानंतर स्पष्ट होईल. 
 


Web Title: Raju Shetty meeting with MNS Chief Raj Thackeray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.