Join us

'राज'टोला... बाप्पांच्या जागी 'प्रसिद्धी विनायक मोदी' तर उंदराऐवजी अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 20:17 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या फटकाऱ्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करतात. आता, ऐन सणासुदीच्या मुहूर्तावरही राज यांनी मोदींच्या प्रसिद्धीप्रेमावर टीका केली आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणपती उत्सावातही मोदी अन् अमित शाह यांना टार्गेट केलं आहे. राज यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहंचा ढोल वाजविण्याचा प्रयत्न केला आहे. राज यांनी गणेश प्रतिमेच्या जागी नरेंद्र मोदी आणि त्यांचे वाहन उंदराऐवजी अमित शाह यांना बसवले आहे. स्वताच्याच प्रसिद्धीच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक असा मथळाही राज यानी या व्यंगचित्रासोबत लिहिला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या फटकाऱ्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करतात. आता, ऐन सणासुदीच्या मुहूर्तावरही राज यांनी मोदींच्या प्रसिद्धीप्रेमावर टीका केली आहे. गणेशमूर्तीत साकारलेल्या नरेंद्र मोदींच्या चार हातात त्यांची चार वेगवेगळी शस्त्रे दाखविण्यात आली आहे. त्यापैकी, एका हातात काही वर्तमानपत्रे आहेत, ( ज्यामध्ये मोदींना नेहमीच प्रसिद्धी दिली जाते). तर दुसऱ्या हातात काही मीडिया प्रतिनिधींचे कॅमेरे दाखविले आहेत. मोदींच्या तिसऱ्या हातात पक्षनिधीसाठी पावती पुस्तक दाखवले आहे. तर गणेशरुपी मोदींच्या चौथ्या हातात ईव्हीएम मशिन दर्शविण्यात आली आहे. याचाच अर्थ, मीडिया, ईव्हीएम आणि अर्थव्यवस्था मोदींच्या हातात असल्याचे राज यांनी आपल्या कुंचल्यातून सूचवले आहे. तसेच मोदींकडून या चारही बाबींचा दुरुपयोग होत असल्याचेही राज यांनी व्यंगात्मकरितीने दर्शवले आहे. 

दरम्यान, राज यांनी आपल्या व्यंगचित्रात मोदींकडून शाळेत करण्यात आलेल्या लघुपट सक्तीविषयीही भाष्य केले आहे. तसेच मोदींची आरती करताना, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसह भाजपचे काही नेते दिसत आहे.  

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीगणपतीगणेशोत्सव