Raj Thackeray: भाजपा-शिंदे गट-मनसे 'महायुती'च्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 13:14 IST2022-10-31T13:12:43+5:302022-10-31T13:14:03+5:30
राज्यात आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अशी महायुती पाहायला मिळणार अशा चर्चा सुरू आहेत.

Raj Thackeray: भाजपा-शिंदे गट-मनसे 'महायुती'च्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी, म्हणाले...
मुंबई-
राज्यात आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अशी महायुती पाहायला मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा आणि मनसे आगामी काळात एकत्र निवडणुका लढवणार अशीची चाचपणी सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता याबाबत खुद्द राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सगळे प्रकल्प गुजरातला जात असतील तर...; राज ठाकरेंनी पंतप्रधानांना करून दिली जबाबदारीची जाणीव
मुंबईत शिवाजी पार्क येथे मनसे आयोजित दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले होते. यावरुनच महायुतीच्या चर्चांना उधाण आलं. "दीपोत्सवाचं उद्घाटन होतं त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं मग यात काही गैर आहे का? उद्या मी फिल्म स्टारला बोलावलं असतं तर मग काय मी चित्रपट व्यवसायात जाणार? असा अर्थ होतो का", असं राज ठाकरे म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
येणारा प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट
महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात असल्यावरुन सरकारला धारेवर धरलं जात असल्याच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी यावेळी भाष्य केलं. "माझी पहिल्यापासूनची भाषणं काढून बघितलीत तर माझं मत हेच की, पंतप्रधान हे देशाचे हवेत. त्यांना प्रत्येक राज्य हे समान मुलांसारखं असलं पाहिजे. महाराष्ट्रातला हा प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट नसतं वाटलं. पण वाईट याचं वाटतंय की जो प्रकल्प येतोय, तो गुजरातला जातोय. पंतप्रधानांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
सध्याचं राजकारण खालच्या पातळीवर
राज्यात राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलत असताना राज ठाकरे यांनी सध्याचं राजकारण अतिशय दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. "सध्याचं राज्यातील राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. राजकीय नेत्यांची आरोप करतानाची भाषा अतिशय खालच्या पातळीवर गेली आहे आणि हे दुर्दैव आहे. अशी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात मी याआधी कधीच पाहिली नाही", असं राज ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"