Join us  

'काका' विरोधात, 'पुतण्या'ची राज ठाकरेंना साद; पवार कुटुंबात मनसेवरून परस्परविरोधी मतं  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 3:22 PM

मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.

ठळक मुद्देमनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था कायम माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपाविरोधातील मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे असे आवाहन केलेशिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये सध्या दबावाचे राजकारण सुरू

मुंबई - मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. असे असतानाच माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपाविरोधातील मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. मनसेला आघाडीमध्ये घेण्याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, ''प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही पाहिले असेलच. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र असेल असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणे गरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत  यावे असे मला वाटते.'' त्याबरोबरच शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या युतीलाही अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. ''शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये सध्या दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यातून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा दोघांचाही प्रयत्न आहेत. आता एक दिवस युती झाल्याची बातमी येईल. हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे सांगितले जाईल,'' असे अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आघाडीची शक्यता फेटाळली होती. राज ठाकरे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. परंतु, निवडणूक समझोत्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आणि ती होईल असं दिसतही नाही, असा खुलासा शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. 

ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी या तीन जागा मनसेसाठी सोडल्यास महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. अलीकडच्या काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राष्ट्रवादीच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाऊ शकतात, अशी कुजबूजही ऐकू येत होती. अगदीच तीन नाही, पण दोन जागा मनसेला देऊन शरद पवार नवा मित्र जोडतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, आघाडीत मनसे नको, अशी काँग्रेसची भूमिका होती. ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य नेते ती ठामपणे मांडत होते. 

टॅग्स :अजित पवारराज ठाकरेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमनसेराजकारण