राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:33 IST2026-01-12T16:32:02+5:302026-01-12T16:33:39+5:30
राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेमध्ये अदानी समूहाचा देशभरात झालेल्या विस्ताराचा मुद्दा मांडला. २०१४ मध्ये अदानी समूह आणि २०२५ मधील अदानी समूहाचे विस्तारलेले स्वरुप या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला घेरले. त्यावर आता अमित साटम यांनी पलटवार केला आहे.

राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी थेट अदानी समूहाच्या झालेल्या विस्तारावर बोट ठेवले. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईत अदानी समूह किती झपाट्याने वाढला, यावर भाष्य करत चिंता व्यक्त केली. त्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिले.
राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेत एक व्हिडीओ सादर केला. त्यात त्यांनी २०१४ मध्ये देशात, महाराष्ट्रात आणि मुंबई महानगर प्रदेशात अदानी समूह किती मर्यादित स्वरुपात होता. याबद्दलचे आकडे मांडले. त्यानंतर त्यांनी २०२५ म्हणजे मागील दहा वर्षात अदानी समूह देशात किती फोफावला, याबद्दलची माहिती दिली.
अमित साटम म्हणाले, "ढोंगी आणि..."
अदानी समूहाबद्दलचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याला उत्तर देताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंना ढोंगी म्हटले.
अमित साटम यांनी राज ठाकरेंना उत्तर देताना दोन फोटो पोस्ट केले. एका फोटोमध्ये राज ठाकरे हे उद्योगपती गौतम अदानी यांना हस्तांदोलन करताना दिसत आहेत. दुसरा फोटो अदानी हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते, त्यावेळचा आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, मिताली ठाकरे दिसत आहेत. हे दोन फोटो पोस्ट करत अमित राज ठाकरेंना म्हणाले, "ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस."
ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस..... @RajThackeray@mnsadhikrutpic.twitter.com/gSzIiiEx6s
— Ameet Satam (@AmeetSatam) January 12, 2026
राज ठाकरे यांनी आधी देशात अदाणी समूहाला गेल्या दहा वर्षात देण्यात आलेले प्रकल्प. नंतर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर प्रदेशात अदानी समूहाचा झालेला विस्तार याची माहिती लोकांसमोर मांडली. सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक नवी मुंबई आणि वाढवण विमानतळावर हलवून मुंबईतील विमानतळाची जागा अदानी समूहाला विकण्याचा डाव असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
"मी उद्योगपतींच्या विरोधात नाहीये, मात्र एकाच उद्योगपतीला अशा पद्धतीने मोठे केले जात आहे, हे मला मान्य नाही", अशी भूमिका राज ठाकरेंनी सभेत मांडली.