'लवकरच बॅकलॉग भरुन काढणार', फेसबुकवर पुन्हा एकदा 'राज'गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:35 IST2018-01-09T19:30:22+5:302018-01-09T19:35:33+5:30
आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकेबाजी करणारे राज ठाकरे शांत का झाले आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता स्वत: राज ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा आपण सक्रीय होत असून लवकरच बॅकलॉग भरुन काढू असं म्हटलं आहे

'लवकरच बॅकलॉग भरुन काढणार', फेसबुकवर पुन्हा एकदा 'राज'गर्जना
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं आणि फेसबुकपासून दूर आहेत. फेसबुक पेज लाँच झाल्यापासून नेहमी सक्रीय असणारे राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शांत होते. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकेबाजी करणारे राज ठाकरे शांत का झाले आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता स्वत: राज ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा आपण सक्रीय होत असून लवकरच बॅकलॉग भरुन काढू असं म्हटलं आहे.
फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरेंनी काय लिहिलं आहे -
सस्नेह जय महाराष्ट्र.
बरेच दिवस आपली भेट नाही, व्यंगचित्रांतून पण आपल्याशी बोलणं झालं नाही. गेल्या वीस दिवसांत इतकं काही घडलंय की व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) जरा जास्तच वाढलाय हे मलाही मान्य आहे.
पण कोणत्याही सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष तसाच ठेवणाऱ्यातला मी नाही.
मी गोष्टी पाहत होतो, त्यातले बारकावे समजून घेत होतो. आता व्यंगचित्रांचा हा बॅकलॉग भरुन काढणार आहे.
यांच्या तडाख्यातून सुटलो असं कोणाला वाटलं असेल तर तसं काही समजून घेऊ नका. ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच.
आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल.
बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा.
आपला नम्र
राज ठाकरे.