Raj Thackeray: "औरंगाबाद संवेदनशील शहर, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 16:34 IST2022-04-22T16:27:51+5:302022-04-22T16:34:21+5:30
राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे

Raj Thackeray: "औरंगाबाद संवेदनशील शहर, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये"
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी केलेल्या आरोपानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तरसभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर आता राज ठाकरेंनी येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितले. तेव्हापासून या सभेला विरोध करण्यासाठी शिवसेनेसह अनेक संघटना सरसावल्या आहेत. आता, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही राज ठाकरेंच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, आम्ही लहान-सहान संघटनांकडे लक्ष देत नसतो, काहीही झालं तरी सभा होणारच, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, असे म्हटले आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे, राज्यातील शांतता बिघडू नये, दंगली घडू नयेत. म्हणून, राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला परवानगी देऊ नये, या सभेमुळे तेथे काहीही घडू शकते, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रकांत खैरेचीही टिका
शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मनसेवर बोचरी टीका करत राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोकांना आणवं लागेल असं म्हटलं आहे. खैरे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला स्वत:हून लोकं येतात. मनसेच्या सभेला लोकं आणण्यासाठी पैसे दिले जातात. सभेला येणाऱ्या लोकांना विचारावं. मागच्या मेळाव्यात ३०० रुपये देऊन लोकं आणली असा दावा त्यांनी केला आहे.
राज ठाकरेंच्या सभेला विरोध
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवावे यासाठी ३ मेपर्यंत मुदत दिली आहे. मशिदीवरील भोंगे ही धार्मिक समस्या नसून सामाजिक समस्या आहे. त्याचा हिंदुंसोबत इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे हे भोंगे उतरवलेच पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केले. राज ठाकरेंच्या या विधानामुळे मुस्लीम समाजात त्यांच्याबद्दल तीव्र आक्षेप घेण्यात आला. राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करणारी विधानं करत असल्याने औरंगाबाद येथील सभेला परवानगी देऊ नये यासाठी विविध संघटनांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली आहे. काहीजण कोर्टातही जाण्याच्या तयारीत आहे.