बिटकॉइन घोटाळाप्रकरणी कुंद्राला समन्स; ईडीच्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:29 IST2026-01-06T12:29:33+5:302026-01-06T12:29:33+5:30
राज कुंद्रा आणि राजेश सतीजा यांचा ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश केला होता.

बिटकॉइन घोटाळाप्रकरणी कुंद्राला समन्स; ईडीच्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाने उद्योगपती राज कुंद्रा आणि दुबईस्थित व्यावसायिक राजेश सतीजा यांना समन्स जारी केले आहे. दोघांना १९ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.
राज कुंद्रा आणि राजेश सतीजा यांचा ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश केला होता. ‘गेन बिटकॉइन’ या पॉन्झी योजनेचा कथित सूत्रधार आणि प्रवर्तक अमित भारद्वाज याच्याकडून राज कुंद्राने युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी २८५ बिटकॉइन स्वीकारले होते. मात्र, हा व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण झाला नाही. तरीही सध्या कुंद्राकडे हे २८५ बिटकॉइन असून त्यांची किंमत १५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा ईडीचा आहे.
ईडीच्या आरोपपत्रात काय?
‘टर्म शीट’ नावाचा करार हा कुंद्रा आणि अमित भारद्वाजचा वडील महेंद्र भारद्वाज यांच्यात झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, असे आरोपपत्रात म्हटले आहे. यावरून हा करार प्रत्यक्षात राज कुंद्रा आणि अमित भारद्वाज यांच्यातच झाल्याचा निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे आपण केवळ मध्यस्थ होतो, हा कुंद्राचा दावा ग्राह्य धरता येत नाही,’ असे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. तो बिटकॉइनचा प्रत्यक्ष लाभार्थी होता, हे स्पष्ट होते, असे आरोपपत्रात नमूद आहे.