रेन वॉटर हार्वेस्टिंग : मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:02 PM2020-08-09T16:02:41+5:302020-08-09T16:03:28+5:30

मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे.

Rainwater Harvesting : The water crisis in Mumbai will be averted | रेन वॉटर हार्वेस्टिंग : मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळेल

रेन वॉटर हार्वेस्टिंग : मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळेल

googlenewsNext

मुंबई : मुंबईत पडणा-या पावसाच्या सर्व पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन केले तर मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगाविणार नाही, असा विश्वास जलवर्धिनीचे उल्हास परांजपे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले आहेत. अद्यापही ५ तलाव भरण्याचे शिल्लक आहेत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडत नाही तोवर मुंबईकरांना जलसंकट राहणार आहे. परिणामी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर मुंबईत पाणी कपात करावी लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी म्हणजे ४ दिवसांत तब्बल १ हजार ७१४ कोटी लीटर एवढया पावसाच्या पाण्याचा उपसा मुंबई महापालिकेने केला. ३ ऑगस्‍ट रोजी संध्‍याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. तेव्‍हापासून ते ६ ऑगस्‍ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्‍या साधारपणे ४ दिवसांच्‍या कालावधीत सर्व उदचन केंद्रामधून तब्‍बल १७ हजार १४५ दशलक्ष लिटर (१,७१४.५० कोटी लिटर) एवढया पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला, असा दावा पालिकेने केला आहे.  ८ हजार ४६ दशलक्ष लिटर एवढी जलधारण क्षमता असणा-या तुळशी तलावातील पाण्‍याच्‍या दुपटीपेक्षा अधिक पाण्‍याचा उपसा गेल्‍या ४ दिवसांत करण्‍यात आला आहे. याबाबत परांजपे यांनी सांगितले, एका कुटुंबात ५ माणसे धरली तर हे पाणी ६८ हजार ५८०  कुटुंबांना वर्षभर पुरेल. म्हणेज एक अर्थाने पावसाच्या सर्व पाण्याचे नियोजन केले तर मुंबईत पाणी कपात करावी लागणार नाही. दरम्यान, नव्या बांधकामास परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्याचा नियमही आहे. आराखडा नगररचना विभागाकडून त्याबाबतचा घेतला जातो. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात येतो की नाही, याची खातरजमा केली जात नाही. हे दुर्देव आहे.

मुंबई शहराची लोकसंख्या सुमारे १ कोटी ३० लाख आहे. मुंबईची पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ४५० दशलक्ष लीटर आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईला तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा व मध्य वैतरणा अशा सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची पाणी साठविण्याची क्षमता सुमारे १५ लाख दशलक्ष लिटर आहे. विशेषत: मुंबईकरांना हजार लिटर पाणी केवळ सव्वाचार रुपयांत मिळते. मुंबई महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये खर्च करते. मुंबईला पाणीपुरवठा असलेल्या जलस्त्रोतातून दररोज पाणी जवळपास ४०० किलोमीटर्स लांबीच्या जाळ्याद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणले जाते. पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी भांडूप जलशुद्धीकरण केंद्र, पांजरापूर येथे साठवले जाते. त्यानंतर २७ जलाशयांमार्फत पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते.  
--------------------------

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमके काय करायचे?
- पावसाळ्यात घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी छताच्या उताराच्या बाजूने पाईप लावून खाली घ्यायचे.
- पाईपद्वारेच हे पाणी विहिरीजवळच्या शोषखड्ड्यात किंवा ते वाहून न जाता जमिनीत मुरेल अशा प्रकारे सोडायचे.
- जवळपास पाच बाय पाच फुटाचा हा खड्डा पाचसहा फूट खोल असावा लागतो.
- त्या खड्ड्यात मोठे दगडं दोन फुटापर्यंत टाकायचे.
- त्यानंतर मध्यम आकाराचे दगड, त्यानंतर जवळपास दोन फूट गिट्टी आणि त्यावर वाळू असे करून घ्यायचे.
- एका कुटुंबाला आयुष्यभर पुरेल एवढ्या पाण्याची सोय नक्कीच होते.

--------------------------

लोकसंख्या आणि पाणी
मुंबईची लोकसंख्या २०११ साली १.२४ कोटी होती.
मुंबईची लोकसंख्या २०२१ पर्यंत १.३० कोटी होईल.
मुंबईची लोकसंख्या २०३१ पर्यंत १.५० कोटी होईल.   

Web Title: Rainwater Harvesting : The water crisis in Mumbai will be averted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.