Join us

Mumbai Metro: पावसाचा मेट्रोसेवेलाही फटका, वरळीतील भुयारी स्थानकात शिरले पाणी; प्रवाशांची चांगलीच तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:11 IST

Water Logging Mumbai Worli Metro Station News: मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वरळीतील भुयारी स्थानकात पाणी शिरले. याचा फटका मेट्रोसेवेला बसला. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नेमके काय घडले ते सांगितले.

Water Logging Mumbai Worli Metro Station News: सोमवार सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरासाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गडगडाटासह मुंबई आणि उपनगरात पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मस्जिद रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा ठप्प झाली. परंतु, यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई मेट्रो ३ मार्गावरील आचार्य अत्रे स्थानक, वरळीतील भुयारी स्थानकात पावसाचे पाणी शिरले आहे. 

काहीच दिवसांपूर्वी आरे ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका या भुयारी मार्गावरील मेट्रो लाईन ३ वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, पहिल्याच पावसात वरळीतील भुयारी रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे भुयारी मेट्रो स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

वरळीतील भुयारी स्थानकात शिरले पाणी

मुंबईतील वरळी भागात सकाळपासूनच तुफान पाऊस पडत होता. परंतु, या पावसाचे पाणी वरळी नाका येथे असलेल्या आचार्य अत्रे चौक या भुयारी मेट्रो स्थानकात शिरले. पायऱ्यांवरून अगदी धबधब्यासारखे पाणी खाली स्थानकात जात होते. याबाबत प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीतील भुयारी स्थानकात अगदी मोठ्या प्रमाणावर साचले होते. यामुळे मेट्रोचे दरवाजे बंदच ठेवण्यात आले होते. प्रवाशांना स्थानकात उतरू दिले जात नव्हते. सुमारे २० मिनिटे मेट्रो ट्रेन वरळीतील स्थानकावरच उभी होती. परंतु, मेट्रोचे दरवाजे बंद असल्यामुळे बाहेर पडता आले नाही. त्यानंतर मेट्रो तेथून निघून स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबली. यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रवासी बाहेर पडले.

मेट्रो स्थानकात चिखलच चिखल

भुयारी मेट्रोतून वरळीत आलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोमध्ये अधिक प्रवासी नव्हते. परंतु, मेट्रोतून बाहेर पडल्यानंतर स्थानकाचे एखाद्या तलावात रुपांतर झाल्याचे दिसत होते. मेट्रोचे दरवाजे उघडल्यावर स्थानकाचे पाणी मेट्रोतही शिरले. यानंतर बाहेर पडल्यानंतर स्वयंचलित जिने बंद होते. स्वयंचलित जिन्याच्या दोन पायऱ्या बुडतील, एवढे पाणी साचले होते. यानंतर स्थानकातील वरच्या मजल्यावर जाताना पायऱ्यांवरून अगदी धबधब्यासारखे पाणी स्थानकात जात होते. वरच्या मजल्यावर आल्यानंतर सगळीकडे चिखल साचला होता. वेफर्सची पाकिटे, बाटल्या असा सगळा कचरा त्या पाण्यासोबत स्थानकात आला होता, अशी माहिती मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली.

दरम्यान, वरळीसह अनेक मेट्रो स्थानकांच्या बाहेर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. वरळीपासून पुढच्या टप्प्याचे कामही सुरू आहे. अशातच मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पाणी भुयारी स्थानकात शिरल्याचे म्हटले जात आहे. यामुळे स्थानकात चिखलाचा थरही साचला आहे.

टॅग्स :मेट्रोपाऊसमुंबई मान्सून अपडेटहवामान अंदाज